आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा. पं. सदस्यांची मागणी:ग्राम सचिवाच्या बेशिस्त कारभाराची चौकशी करून निलंबन करा ; निमखेड बाजार येथे पत्रकार परिषद

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमखेड बाजार येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत सचिव सुनील देशमुख यांची कारकीर्द ही त्यांच्या कार्यवृत्तीमुळे त्रासदायक व वादग्रस्त ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणाच्या तक्रारी संदर्भात सरपंचाला हाताशी धरून कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्याची मागणी निमखेड बाजार येथील विनोद शेळके, गजानन कबाडे यांच्यासह काही ग्रा. पं. सदस्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ग्रा. पं.च्या आर्थिक व्यवहारात व कामकाजात अनियमितता तसेच सरपंच, सदस्य यांना विश्वासात न घेता खोटे ठराव घेणे, नागरिकांना पावती न देणे, त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांची रेकॉर्डला नोंद न ठेवणे आदी, अतिक्रमणधारकांच्या बाजूने ठराव घेणे, प्रत्यक्ष मोजमाप न करता बांधकामाची परवानगी देणे, त्यामुळे अशा बेशिस्त व नियमबाह्य काम करणाऱ्या सचिवाची खातेनिहाय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पत्रकार परिषदेत तक्रारदार विनोद शेळके, गजानन कबाडे यांनी केली. पत्रपरिषदेला ग्रा. पं. सदस्य नंदकिशोर शेळके, सुषमा वाघमारे, निता बोचरे, नंदना जामणिक उपस्थित होत्या. त्यांनीही सरपंच व सचिव यांच्या बेजबाबदार कारभाराचा पाढा वाचला.

लावलेले आरोप तथ्यहीन व खोटे आहेत
माझ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात होत असलेली विविध विकास कामे विरोधकांकडून पाहवली जात नसल्याने ते काही जणांना हाताशी घेऊन माझी व ग्रामपंचायतीची बदनामी करत आहेत. माझ्यावर लावलेले आरोप हे तथ्यहीन व खोटे आहेत. विरोधकांनी विरोध करण्याऐवजी चांगल्या कामात मला सहकार्य करावे, असे सरपंच विपिन अनोकार यांनी सांगितले.

कोणालाही पाठीशी घालत नाही
अतिक्रमणा संदर्भात आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. तक्रार असलेल्या रस्त्याचे मोजमाप वरिष्ठांनी केले. त्यानुसारच आम्ही भूमिका घेतली असून मी व माझ्या कर्मचाऱ्यांनी पावतीशिवाय पैसे घेतले नाहीत. ग्रामपंचायत ही सर्वानुमते चालत असते. कोणतेही ठराव हे सर्वसंमतीने घेतले जातात. तक्रारकर्ते हे बहुतेक वेळा सभेतूनच निघून जातात. त्यामुळे त्यांनाच ठरावाबाबत माहिती नसते, अशी माहिती सचिव सुनील देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...