आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीच्या खा. नवनीत राणा यांना एका निनावी पत्रातून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान सीमेवरून काही व्यक्ती अमरावतीत आले असून ते तुमच्या घरीसुद्धा येऊन गेले आहेत, त्यामुळे तुम्ही सतर्क रहावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात खा. राणा यांचे पीए विनोद गुहे यांनी शनिवारी दुपारी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुध्द एनसी दाखल केली आहे.
शुक्रवारी सकाळी खा. नवनीत राणा यांचे पीए विनोद गुहे नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे आलेले अर्ज, निवेदनांची पाहणी करत होते. त्यावेळी एका पांढऱ्या लिफाफ्यात आलेले पत्र त्यांनी वाचले. ते पत्र हिंदीत लिहिले आहे, की मी अमरावती शहरातीलच रहिवासी आहे. मी माझे नाव सांगू शकत नाही, पण तुम्ही थोडं सांभाळून राहा. काही व्यक्ती तुमचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शासकीय नोकर असून माझी बदली तुम्ही करून दिली तसेच माझ्या वडिलांना कोरोना काळात तुम्ही मदत केली आहे. राजस्थान सीमेवरून काही संशयित व्यक्ती अमरावतीत आले आहेत. मला अशी माहिती मिळाली आहे की त्या व्यक्ती तुमच्या घरीही येऊन गेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपण सतर्क रहावे तसेच भविष्यात आपण याहीपेक्षा प्रगती करावी असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
सखोल तपास सुरू
खा. नवनीत राणा यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा आहे. तसेच त्यांना केंद्रीय सुरक्षा दलाकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही खा. राणा यांच्या घरी जाऊन पुन्हा एकदा सुरक्षेचा आढावा घेतला तसेच हे पत्र कोणी आणले, कसे आणले याबाबत सखोल तपास सुरू केला आहे.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.