आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:बाळाच्या जन्मापासून पंधरा वर्षांपर्यंत दाखल्यात नाव समाविष्ट करणे शक्य

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रथमच जन्म-मृत्यू विभागाची कार्यपद्धती मनपा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी जाहीर करण्यात आली असून, यात संबंधित अधिकाऱ्यांची नावे तसेच कामाचे स्वरूपही देण्यात आले आहे. जन्माच्या दाखल्यात बाळाचे नाव त्याच्या जन्मापासून तो १५ वर्षांचा किशोर होइपर्यंत जन्म-मृत्यू अधिनियमानुसार समाविष्ट करता येते, अशी महत्त्वपूर्ण माहितीही मनपाद्वारे देण्यात आली आहे.

महानगरपालिकेत जन्म-मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी सर्वाधिक गर्दी होत असते. काही तक्रारी असतात तर काही किचकट प्रकरणे असतात. या सर्व समस्या सोडवण्यासाठी मनपाने या प्रभागाची कार्यप्रणालीच सार्वजनिक केली आहे. जन्माच्या दाखल्यासाठी खासगी हॉस्पिटलमधील जन्म नोंद अहवाल, जन्म झालेल्या बाळाच्या आई-वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत व अर्ज द्यावा लागतो. नागरिकांना प्रत्येक दाखल्यासाठी १० रुपये शुल्क भरावे लागते. बाळाचे नाव टाकण्यासाठी १० रुपये वेगळे शुल्क आकारले जाते. मृत्यूच्या दाखल्यासाठी घरी मृत्यू झाला असल्यास फॉर्म क्र.४ अ, हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यास फार्म क्र. ४, मृत्यू अहवाल नमूना क्र.२, स्मशान भूमीतील मृत्यूची नोंद असलेली पावती, मृत्यू झालेल्या व्यक्तीची आधार कार्ड झेरॉक्स प्रत, मृतांच्या वारसांची आधार कार्ड झेरॉक्स प्रत, शव विच्छेदन झाले असल्यास त्याचा अहवाल. रुग्णालयातून जन्म किंवा मृत्यूची नोंद २१ दिवसांच्या आत मनपा कार्यालयाला मिळते. त्यानंतर जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये नोंदी उतरवल्या जातात. जेव्हा नागरिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची मागणी करतात तेव्हा मागणीनुसार कागदपत्रे द्यावी लागतात.

जर इंग्रजीत लिहिलेल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असेल किंवा मराठीत काना, मात्रा, उकार चुकले असतील तर त्यात दुरुस्ती करून दाखल्याची नवी प्रिंट दिली जाते. नाव ऊर्फ करून हवे असल्यास नागरिकांकडून १०० रु.चे प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड, पारपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वाहन परवाना यापैकी कोणतीही तीन कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व कागदपत्रे व अर्जाची तपासणी उपनिबंधक डाॅ. विक्रांत राजुरकर यांच्याकडून तपासणी केली जाते. उपनिबंधकाची खात्री पटल्यानंतर ते स्वाक्षरी करतात व त्यानंतर नावात ऊर्फ शब्द टाकून दाखले दिले जातात. जन्म-मृत्यूचे रजिस्टर जीर्ण झाले असल्यास तसेच संबंधितांकडे मूळप्रत दाखला असेल तर तो न्यायालयाच्या आदेशानुसार ग्राह्य धरला जातो.

पाचही झोनमध्ये मिळतो जन्म-मृत्यू दाखला
जन्म-मृत्यू दाखला हा सर्व झोनमधून वितरीत केला जातो. परंतु, दुरुस्ती व नाव टाकणे हे काम मनपा आरोग्य विभागात केले जाते. २०१६ पूर्वीचे दाखले ऑफलाइन पद्धतीने काढण्यात येत असून त्यानंतरचे सर्व दाखले सीआरएस पोर्टल मार्फत काढले जातात. दिव्यांगांसाठी तळमजला असलेल्या खिडकीतूनच दाखल देण्यासाठी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...