आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे 12 ठिकाणी हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर:अमरावती महापालिका क्षेत्रात येत्या 15 डिसेंबरपासून होणार सुरुवात

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात १२ विविध ठिकाणी येत्या १५ डिसेंबरपासून मनपाचे हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर (आयुष्यमान भारत, आरोग्यवर्धिनी केंद्र) सुरू होणार आहेत. या ठिकाणी हृदयरोग, मधुमेह असलेल्या रुग्णांची तपासणी, औषधोपचार, आहाराबाबत सल्ला तसेच व्यायाम याबाबत तर मार्गदर्शन केले जाईलच शिवाय साथरोग, महिलांचे आजार याबाबत मार्गदर्शन, उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे मनपाच्या दवाखान्यांसोबतच आता उपचारासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा नवा पर्याय शहरवासीयांना उपलब्ध होत आहे.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मनपाला १२ हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली. प्रत्येक दवाखान्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी २१.५ लाख रु. खर्च आला. मनपाने १२ सेंटर्स करिता एकूण २ कोटी ५८ लाख रू. खर्च करण्यात आले आहेत. या ठिकाण एक डाॅक्टर, एक स्टाफ नर्स, मल्टिपर्पज वर्कर, आशा सेविका आणि अटेंडंट असे पाच व एकूण ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली होती.

या ठिकाणी महिलांना गरोदरपणा व बाळंतपणात घ्यावयाची काळजी व उपचार, बालकांसह किशोरवयीन मुले व मुलींसाठी आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन, गर्भ निरोधक व इतर प्रजनन आरोग्य सेवा, साथरोग उपचार व औषध, शासनाचे आरोग्य कार्यक्रम, लहान आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोगांसाठी स्क्रिनिंग, प्रतिबंधात्मक, नियंत्रण व उपचार सेवा, सामान्य नेत्र तसेच कान, नाक, घसा यांच्या आजारांसंबंधी सेवा, मौखिक आजारांसाठी सेवा, वृद्धांसाठी आरोग्य सेवा, आपत्कालीन जसे जळणे, ट्राॅमा आरोग्य सेवा, मानसिक विकारांसाठी स्क्रीनिंग व प्रथमोपचार आणि योगासन, व्यायाम शिकवणे अशा आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.

ही आहेत १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे झोन क्र. १ मध्ये नवसारी गावठाण मनपा शाळा, रहाटगाव दवाखाना, गाडगेनगर परिसरातील राधा नगर प्रगती शाळा, झोन क्र. २ मध्ये अंबिकानगर मनपा शाळा, रुक्मिणीनगर मनपा शाळा क्र. १९, बजरंग प्लाॅट मनपा शाळा क्र. ८, शारदानगर पन्नालाल बगीचा येथील एक सभागृह, झोन क्र. ३ मध्ये शुक्रवारा बाजार मनपा दवाखान्यातील एक सभागृह, चपराशी पुरा उर्दू मनपा शाळा क्र. ६, झोन क्र. ४ मध्ये अकोली येथील दवाखान्याची एक खोली, बडनेरा मनपा शाळा क्र. २४ आणि माया नगर येथील मनपा शाळा.

तयारी पूर्ण; लवकरच सुरू करणार शहरात १२ हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर असून मनुष्यबळाची नियुक्ती, देखभाल दुरुस्ती अशी संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच हे सर्व सेंटर सुरू केले जाणार असून, त्यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. -डाॅ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...