आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निसर्गातील इवलासा इंजिनिअर साकारतोय आशियाना; पावसाळ्यापूर्वी पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याच्या आधी पक्ष्यांना पावसाचे संकेत मिळतात. प्रत्येक सजीवाची इच्छा असते आपला वंश वाढावा व पुढे बहरावा. त्यामुळे आपल्या पिल्ल्यांसाठी छोटासा का होईना हक्काचा, सुरक्षित निवारा उभारण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. सध्या पावसाळा तोंडावर आल्याने निसर्गातील छोट्या इंजिनिअरची आपला हक्काचा आशियाना बांधण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

निसर्गातील बदलाची पहिली चाहुल पशू-पक्षांना लागते. त्यानुसार त्यांच्या वर्तनात फरक पडू लागतो. वातावरणातील बदल सर्वात आधी त्यांच्या लक्षात येतात. त्यानुसार त्यांच्या हालचालींमध्ये बदल होताना दिसून येतात. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात निसर्गनिर्मित आहे. दरवर्षी पावसाळाच्या प्रारंभी पक्षांची सुंदर घरटी आपल्याला पहायला मिळतात. पक्षांना आपल्या भावना व्यक्त करता येत नसल्या, तरी आपल्या कला व कौशल्याने ते सुरक्षित व सुंदर घरटे बांधतात. पावसाळ्यात आपल्या पिलांचे सरंक्षण होण्याच्या दृष्टीने पक्षी घरटे बांधणीच्या कामाला प्राधान्य देतात. सध्या नर व मादी दोघेही मिळून घरटे बांधत असल्याचे चित्र भागात पहायला मिळत आहे.

झाडे, झाडांच्या ढोली, घरातील एखादी सुरक्षित जागा आदींची पक्षी घरटे बांधणीसाठी निवड करतात. काही वेळा जमिनीवर व बिळातही घरटे बांधले जाते. आता मात्र मानवी हस्तक्षेपामुळे बदल चाललेल्या पर्यावरणानुसार पक्षांनी घरटी बांधण्याच्या जागांमध्ये काही बदल केले असल्याचे पहायला मिळते. किंबहुना त्यांना ते गरजेचे झाले आहे. काही पक्षी मोबाइलच्या उंच टॉवरवर, तर काही पाईपमध्येही घरटी बांधताना दिसतात. निसर्गात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांचा सूक्ष्म परिणाम करून घेणारे अनेक पशुपक्षी आढळतात. फुलांच्या, पक्षांच्या होणाऱ्या आगमनावरून पावसाचे संकेत मिळतात.

कावळा, पावशाही देतो पावसाचे संकेत
कावळ्याने मे महिन्यात काटेरी वृक्षांवर घरटे बांधल्यास पाऊस कमी पडतो. तर आंबा, करंज वृक्षांवर बांधल्यास पाऊस चांगला पडतो, असे बोलले जाते. पावशा पक्षीसुद्धा सृष्टीतील बदलांचे संकेत देतो.

मे, जून या दोन महिन्यात असतो विणीचा हंगाम
मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मे, जून हा विणीचा हंगाम असतो. मनुष्याच्या आधी पक्ष्यांना पाऊस येणार असे संकेत मिळतात. साधारणत: जून महिन्यात पक्षी अंडी देतात. त्याआधी ते घरटी बांधतात. पावसाळ्यात पिलांना भरवण्यासाठी किटक तसेच इतर अन्न विपुल प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे सध्या पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
- यादव तरटे, वन्यजीव व पक्षी अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...