आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा सन्मान:मोहोड, चिंचाळकर, कथलकर, लावरे यांना जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे शुक्रवार 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त शहरातील चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 11 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व एक वर्षाचे विमा कवच असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रभारी माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पुरस्कारांचे प्रायोजक मतदारचे संपादक एड. दिलीप एडतकर, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, जनमाध्यमचे अभीराम देशपांडे व प्रतिदिन - वृत्त केसरीचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी शशांक लावरे यांना प्रतिदिन - वृत्तकेसरी पुरस्कृत लक्षवेधी, वैभव चिंचाळकर यांना हिंदुस्थान पुरस्कृत बाळासाहेब व डॉ. अरुण मराठे प्रभावी, महेश कथलकर यांना विदर्भ मतदार पुरस्कृत ममता एडतकर उत्कृष्ट तर गजानन मोहोड यांना जनमाध्यम पुरस्कृत अनिल कुचे शोध पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यावेळी म्हणाल्या, पत्रकारांवर महत्त्वाची जबाबदारी असून त्यांना नेहमी सामाजिक जाणीवेने काम करत जनजागृती करावी लागते. प्रशासनालाही त्यांच्या माध्यमातूनच कामाची दिशा कळते. पुढे बोलताना विद्यार्थीदशेत वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपणास शिक्षणही मिळाले, याचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत असतानाही वृत्तपत्रातील माहितीचा मला खूप फायदा झाला, हेही स्पष्ट केले.

आयोजनाचे तोंडभरुन कौतुक करतानाच पत्रकारांचे कामकाज कसे खडतर व जोखीमीचे आहे, याची आपणास जाणीव असल्याचे स्पष्ट करीत त्यांना यथायोग्य सहकार्य करण्याचे अभीवचन दिले. पत्रकारितेचे विश्व हे सर्वांसाठीच लाभदायक आहे.

जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार तसेच महावितरणचे फुलसिंग राठोड, महापालिकेचे भूषण पुसतकर व विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर अशा चार सदस्यीय समितीने पुरस्कारर्थींची निवड केली. यावेळी पवार यांनी पत्रकार निवडीची प्रक्रिया व शुभेच्छापर संबोधन केले. अध्यक्षीय भाषणातून हरणे यांनी पत्रकार संघाच्या एकूण वाटचालीचा आलेख मांडतानाच पत्रकारांच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...