आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​देशप्रेमाचा उत्सव:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा ग्रामीण भागातही जल्लोष ; ‘घरोघर तिरंगा’ उपक्रमास प्रतिसाद

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही प्रचंड जल्लोष दिसून आला. स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचा सहभाग होता, त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार, तिरंगा रॅली व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. केंद्र सरकारच्या ‘घर-घर तिरंगा’ या आवाहनानुसार, अनेकांनी आपापल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवून १९४७ व त्यापूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीतील युद्धांना नमन केले.

भाकपच्या कार्यालयात राष्ट्रध्वजाला केले वंदन अमरावती : येथील नमूना चौथी गल्ली स्थित भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातही राष्ट्र ध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी भाकपचे तालुका सचिव नीळकंठ ढोके, शहर सचिव शरद मंगळे, माजी शहर सचिव उमेश बनसोड, तालुका कौन्सिलर दिगंबर नगेकर, आयटकचे पदाधिकारी चंद्रकांत बानुबाकोडे, बांधकाम कामगार संघटनेचे नंदू नेतनराव, नौजवान सभेचे गजानन दरेकर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव पेठ येथे खा. बोंडे यांच्या नेतृत्वात रॅली नांदगाव पेठ : स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव समितीच्या वतीने येथील युवक-युवतींनी मोटारसायकलवरून तिरंगा रॅली काढली. यामध्ये खासदार डॉ. अनिल बोंडे व भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी-दिघडे यांनीही सहभाग दर्शवला. स्थानिक झेंडा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. राजपूतपुरा, टोल नाका, बस स्टँड, पोलीस स्टेशन, शासकीय वसाहत, शिक्षक कॉलनी, कामठा चौक, माळीपुरा, कुंभारपुरा, रंधवेपुरा, यावलपुरा, बारीपुरा, काळा मारोती चौक असे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ अशा घोषणांमुळे परिसरात देशभक्ती वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस ठाणे, पालिकेत राष्ट्रध्वजाला सलामी शेंदुरजनाघाट : येथील पोलीस ठाणे व नगर परिषद कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्र ध्वजाला सलामी देण्यात आली. पोलिस ठाण्यात ठाणेदार सतीश इंगळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी महिला पोलिस निरीक्षक शुभांगी थोरात यांच्यासह देवदास उईके, स्वप्निल बायस्कर, लक्ष्मण साने, रत्नदिप वानखेडे, निकेश गाढवे, पंकज गावडे, पुंजाराम मेटकर, अतुल मस्के, कुंदन मुधोळकर, विलास कोहळे, शैलेश घुरडे, बंसी पानजंजाळ, चंद्रकांत केंद्रे आदी कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करम्यात आले. तर मलकापूर आठवडी बाजार येथे शहरातील सार्वजनिक ध्वजवंदन नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले यांचे हस्ते करण्यात आले.

बडनेरा नवी वस्ती येथे रास्वसंचे पथसंचलन बडनेरा : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बडनेरा नवी वस्तीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. गणवेशधारी स्वयंसेवकांनी काढलेली मिरवणूक नव्या वस्तीच्या विविध भागातून फिरविण्यात आली. बँडपथक आणि बाल चमूचा सहभाग तसेच लाठी-काठीची प्रात्यक्षिके ही पथसंचलनाची वैशिष्ट्ये ठरली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा संघ स्वयंसेवक शिवराय कुळकर्णी व इतरांनी या पथसंचलनाचे नेतृत्व केले. जुन्या व नव्या वस्तीतील सर्व शाखांचे स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते.

पूर्णा मध्यम प्रकल्प कार्यालयातही ध्वजवंदन चांदूर बाजार : नजिकच्या विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या कार्यालयातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात आली. कार्यालयातील सर्व अधिकारकी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पाळा येथे सातपुडा माध्य. विद्यालयात ध्वजारोहण मोर्शी : येथून जवळ असलेल्या पाळा येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्या करिता ज्यांनी प्राणाची आहुती देऊन जीवनाची राख रांगोळी केली, अशा सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक भागवत चव्हाण यांनी तर आभार विलास खोब्रागडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव घोंगडे, संचालक प्रल्हादराव घोंगडे, पोलिस पाटील सागर साठे, प्रहार संघटनेचे उपतालुकाप्रमुख नरेंद्र सोनागोते, शाळेचे माजी मुख्याध्यापक मोहन कानफाडे, निवृत्त लिपिक सुनील मुंगसे, सुनील शिरसाट व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी तथा समस्त गावकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वेल्फेअर फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान’ कुऱ्हा: ‘घर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत येथील सर्व घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. दरम्यान, १५ ऑगस्टनंतर राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, यासाठी वेल्फेअर फाउंडेशन व मोक्षधाम समितीकडून सर्व ध्वज एकत्र करण्याचा ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान’ उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रध्वज कुठेही पडून राहणे, रस्त्यावर दिसणे किंवा इतर कुठल्याही कारणाने त्याची अवमानना होऊ नये यासाठी १५ ऑगस्टला सायंकाळी ५.४५ वाजतानंतर ठिकठिकाणी फिरून दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज गोळा केले. या अभियानाला नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद दिला. ग्रा.प.सदस्य, तंटामुक्त समिती व गावातील नागरिक मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते.

आदिवासी आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव शेंदुरजनाघाट : येथील भवानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित जय भवानी आदिवासी आश्रम शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष रमेश श्रीराव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. पठाण कोट येथे कार्यरत असलेले सैनिक जितेंद्र नामदेव नंदन वार (रंगारपेठ, पुसला), माजी सैनिक सुरेश ढोरे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक कुटुंबातील दिलीप देशमुख व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतून खेलो इंडियासाठी निवड झालेली विदर्भातील एकमेव खेळाडू श्रावणी श्रीराव यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच ४ ते १४ ऑगस्टपर्यंत शाळेत घेण्यात आलेल्या चित्रकला, गायन, क्रीडा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सर्व शिक्षक तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सर्वत्र उत्साह,जोश दिसून आला,

बातम्या आणखी आहेत...