आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली आली गौराई:ज्येष्ठा गौरींचे आज होणार आगमन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात झालेल्या बाप्पाच्या आगमन पाठोपाठ ‘आली आली गौराई, सोन्यारूप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धन धान्याच्या पावलानं,’ असे म्हणत शनिवारी (दि. ३) सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी घरातील महिलांसह आबालवृद्धांची एकच लगबग दिसत असून, त्यांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. या माहेरवाशीणीचे स्वागत ही महिलांसाठी जिव्हाळ्याची बाब आहे.

गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखली जाते. तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घरा घरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यांपिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, तर काही घरी नवसाच्या म्हणून बसवल्या जातात. काही ठिकाणी पितळेचे, तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे असलेल्या, तर काही ठिकाणी खड्यांच्या रुपात त्या बसवल्या जातात. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होताच सर्वांना वेध लागतात ते ज्येष्ठा-कनिष्ठेच्या आगमनाचे. पंचागानुसार. त्यांच्या आगमनाचा मुहूर्त रात्री १० वाजून ५६ मिनिटांनंतर असला, तरी मात्र महिलांसह आबालवृद्धांची एकच धावपळ दिसून येत आहे, तर तरुणाई आपली सजावट अधिकाधिक कसे सुंदर होणार यामध्ये कार्यमग्न झाल्याचे पहायला मिळत आहे.

बाजारपेठ गर्दीने फुलली
महालक्ष्मींच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली आहे. त्यामुळे गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत शुक्रवारी (दि. २) रात्री उशीरापर्यंत महिलावर्गाकडून महालक्ष्मींसाठी साड्या, दागिने, सजावटी साहित्य, राशीवर ठेवण्यासाठी फळे, फराळ, रांगोळी, मखरे, फुल माळा आदींच्या खरेदीची लगबग दिसून आली.

रेडिमेड साहित्याला पसंती
तीन दिवसांच्या मुक्कामाने घरी येणारी महालक्ष्मी संतुष्ट राहावी. तिच्या पाहुणपणात कुठेही कमतरता राहू नये म्हणून महिला कामाला लागलेल्या आहेत. फुलोऱ्यासाठी करंज्या, पापड्या, वेण्या, अनारसे, लाडू, चकल्या आदींचे महत्त्व आहे. हा फराळ तयार करण्यासाठी महिलांची लगबग सुरू असून, त्याचा दरवळ मनाला मोहिनी घालत आहे.

बातम्या आणखी आहेत...