आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शंभरावर संघांमध्ये रंगणार कबड्डीचा महासंग्राम ; दोन वर्षांनंतर मिळाली संधी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षे जिल्हा क्रीडा स्पर्धा झालीच नाही. यंदाही उशिरा का होईना पण, दिवाळीनंतर आता जिल्हा क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या असून सोमवार ५ ते ७ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तिन्ही वयोगटातील मुले व मुलींचा कबड्डी महासंग्राम रंगणार असून, प्रथमच शाळांचे १०० वर संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. २०२० मध्ये ८० संघांचा सहभाग होता. त्यामुळे ही संधी सोडायची नाही, या भावनेने बहुतेक शाळांनी यंदा मोठया संख्येत सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ५ डिसेंबर रोजी स. ९ वाजतापासून सुरू होईल. कबड्डीचे तज्ज्ञ असलेले क्रीडा शिक्षक संदीप इंगोले तसेच महानगर शारीरिक शिक्षण संघटनेतील क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ पंच मंडळींनी अचूकपणे आखणी करून सात मातीचे कबड्डी कोर्ट तयार केले आहेत. तसेच रविवार ४ रोजी सकाळी त्यावर टँकरद्वारे पाणीही शिंपडण्यात आले. जेणेकरून माती ही नरम रहावी. तालुका स्तरावरील विजेत्या संघांसह मनपा क्षेत्रातील बहुतेक शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

पहिल्या दिवशी सोमवार ५ रोजी १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील मुलींचे कबड्डी सामने घेतले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार ६ रोजी १४ व १९ वर्षांखालील मुलांच्या गटातील लढती होतील. बुधवार ७ रोजी केवळ १७ वर्षांआतील वयोगटातील मुलांचे कबड्डी सामने घेतले जाणार आहेत. स्पर्धेतील १०० वर संघांचा सहभाग लक्षात घेता आयोजन समितीने वेगवेगळ्या दिवशी स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला.मैदानावर पंचगिरी करणाऱ्या पंचांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा उशिरा सुरू झाली तरी सर्व शाळांनी कमी कालावधीत जय्यत तयारी केली आहे. सहभागही विक्रमी राहणार असल्याने कबड्डी स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तीन दिवसांत सुमारे १ हजार खेळाडू तिन्ही वयोगटात जेतेपदासाठी झुंजणार आहेत.

मोठ्या सहभागाची कारणे मातीतील खेळ आहे. कबड्डीची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या खेळासाठी कोणताही खर्च येत नसल्याने तसेच ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्पर्धा हाेत असल्याने या खेळाबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. खेळाडूही मोठ्या संख्येत मिळतात. त्यामुळे संघ निवडताना चांगलीच स्पर्धा असते. मुलेच नव्हे तर मुलीही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...