आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कांडली जि. प. शाळेत फडकवला उलटा ध्वज; कारवाईची मागणी

परतवाडा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर पं. स. अंतर्गत येणाऱ्या कांडली येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेत महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

विशेष म्हणजे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षक घरी निघून गेल्यानंतरही त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र याच परिसरातील काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत ग्रा. पं. सदस्य दीपक चव्हाण यांना माहिती दिली. त्यांनी शाळेत येऊन त्याबाबत शहानिशा करत मुख्याध्यापकांना माहिती दिली. त्यानंतर ध्वज खाली उतरवून पुन्हा नव्याने तिरंगा फडकवला. या बाबत बीडीओ श्रीकृष्ण सावळे यांना तक्रार दिल्यानंतर गटशिक्षणाधिकारी अब्दुल कलीम चौकशीसाठी दाखल झाले.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावीत असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी नियम असतानाही कांडली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष वर्मा यांनी तो उलटा फडकवला. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अब्दुल कलीम यांनी शाळेत दाखल होत मुख्याध्यापक व शिक्षकांचे बयान नोंदवले.

या वेळी सरपंच सविता आहाके, उपसरपंच गंगा धंडारे, ग्रा. पं. सदस्य दीपक चव्हाण व शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रध्वजाच्या अवमानाबाबत योग्य ती कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली, तर उपस्थित शिक्षकांनी हा राष्ट्रध्वज अनवधानाने उलटा फडकवला गेल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, शाळेत उलटा ध्वज फडकावल्याने या त्यागाचा अवमान झाला. ही गंभीर बाब असल्याने संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य दीपक चव्हाण यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...