आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेतील काही जागा खासगी विकासकाला देण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आल्या. तसेच त्यासाठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा यांनी आज, शनिवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
हा व्यवहार अत्यंत घाईघाईत झाला असून त्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची शंका संस्थेचे एक सदस्य अॅड. दिलीप एडतकर यांनी व्यक्त केली होती. त्याचे खंडन करताना लढ्ढा शनिवारी माध्यमांसमोर आले. त्यांनी सांगितले की संस्थेला लीजवर देण्यात आलेली जागा भोगवटदार-एक या संवर्गातून भोगवटदार-दोन या संवर्गात रितसर प्रक्रियेनुसार बदलून घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठीची सर्व कागदपत्रे संस्थेकडे उपलब्ध असून ती सर्व सदस्यांना वितरित करण्यात आली आहे.
लढ्ढा यांच्यामते संस्थेच्या त्या जागेवर एखादी व्यवसायिक इमारत उभी करुन संस्थेसाठी उत्पन्नाचा स्रोत तयार करण्याचा विचार पुढे आल्यानंतर ही घडामोड सुरू झाली. गेल्या तीन वर्षांपासून या विषयावर चर्चा व मंथन सुरु आहे. दरम्यानच्या काळात यासाठी संस्थेचे पदाधिकारी व इतर तज्ज्ञ मंडळीचा समावेश असलेली ‘डेव्हलपमेंट कमिटी’ गठित करण्यात आली. या समितीने इतर तज्ज्ञांशी चर्चा करुन एक योजना तयार केली. या योजनेला मूर्त रुप देण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन स्वत:च ती राबवावी, असे सुरुवातीला संस्थेला वाटत होते.
परंतु कर्ज काढण्यासाठी त्यांना द्यावा लागणारा नकाशा, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि मूळ म्हणजे भाग भांडवल देण्याइतपत संस्थेची स्थिती नसल्यामुळे खासगी विकासकाच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी संस्थेने स्थापन केलेली समिती, कार्यकारी मंडळ आणि विशेष आमसभा असा त्रिस्तरीय प्रवास पूर्ण करण्यात आला. दरम्यानच्या काळात यासाठी निविदा प्रक्रिया राबवून खासगी विकासक संस्थेला काय-काय देणार, याचीही चाचपणी करण्यात आली.
विशेष असे की या विषयावरील विशेष आमसभा नुकतीच पार पडली. या आमसभेला ९९ पैकी ६४ सदस्य उपस्थित होते. त्या सभेत एड. दिलीप एडतकर यांच्याशिवाय कुणीही सदर प्रकल्पास विरोध दर्शविला नाही. अर्थात ६४ पैकी ६३ सदस्यांनी होकार दर्शवून काम पुढे नेण्यास पाठिंबा दिला. विशेष सभेत एड. दिलीप एडतकर यांनी विचारलेल्या ११ प्रश्नांची लेखी उत्तरेही त्यांना देण्यात आली.
तर त्यांनीच विकासक मिळवून द्यावा
अॅड. एडतकर यांनी सदर जागा आणि तेथील दर याबाबत केलेले दावे वस्तुस्थितीदर्शक नाही. शिवाय बिल्डरच्या घशात फायदा ओतण्यासाठी हे केले जात आहे, असेही नाही. या संस्थेचे एक सदस्य म्हणून त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन फायद्याचा व्यवहार करावा, आम्ही सर्व पदाधिकारी-सदस्य त्यांना पाठिंबा देऊ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.