आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा केला होता बनाव:वकील भावजयीचा नणंदेसह दोन अल्पवयीनांनी गळा दाबून केला खून

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यकंय्यापुरा भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय वकील महिलेला तिच्याच नणंदेसह नात्यातील दोन अल्पवयीनांनी गळा दाबून तसेच डोक्यात रॉड मारुन खून केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी नणंदेला अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. घरगुती वादातून हा थरार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सविता सुशील संदनशिवे (४०, रा. व्यंकैय्यापुरा) असे मृत वकील महिलेचे नाव आहे. सविता संदनशिवे यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे तीन मुलींना घेऊन त्या सासरी राहत होत्या. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सासू, त्यांच्या घरी राहणाऱ्या नणंदेसोबत तसेच अन्य दोन अल्पवयीन नातेवाइकांसोबत त्यांचा वाद व्हायचा. सविता यांना ११ वर्षे, ६ वर्षे व २ वर्षे वयाच्या तीन मुली आहेत. ७ सप्टेंबरला सविता या त्यांच्या बहिणीसोबत एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी शेंदूरजना घाट येथे गेल्या होत्या.

दरम्यान, ८ सप्टेंबरला त्या अमरावतीत घरी परत आल्या. त्यावेळी नणंदेसोबत त्यांचा पुन्हा वाद झाला. त्यावेळी नातेवाइक असलेले दोन अल्पवयीन मुलंसुद्धा घरीच होते. खुनाचा आरोप असलेली नणंद हिचे लग्न झाले असून, तिला नाशिक येथे दिले मात्र, मागील एक ते दीड वर्षांपासून ती माहेरी येऊन राहत आहे. दरम्यान, या वादामध्येच नणंद व दोन अल्पवयीन मुलांनी सविता यांना मारहाण केली. तसेच गळा दाबून तसेच डोक्यावर लोखंडी रॉड मारुन त्यांचा खून केला. यावेळी कोणालाही खुनाचा संशय येऊ नये म्हणून या तिघांनी सविता यांच्या अंगावर चादर टाकून त्यांच्या हातात एक औषधाची बाटली ठेवून दिली.

दरम्यान ८ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास सविता यांची मोठी मुलगी घरात आली. तिने आवाज दिले तर सविता या उठल्या नाहीत, मुलीला वाटले आई झोपली आहे. मात्र, काही वेळाने मुलगी पुन्हा परत आली. त्यावेळीसुद्धा त्या उठल्या नाहीत, म्हणून मुलीने तिच्या आजीला म्हणजेच सविता यांच्या सासू चंद्रकला सदंनशिवे यांना सांगितले. त्यांनी पाहिले असता सविता या बेशुद्धावस्थेत असून त्यांच्या हातात औषधाची बाटली होती. म्हणून त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सविता यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ८ सप्टेंबरला उशिरा रात्री पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन चौकशी सुरू केली.दरम्यान, शुक्रवारी (दि. ९) सविता यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा दिसल्या.त्यामध्ये डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याचवेळी सविता यांच्या भगिनी संगीता नरेंद्र वानखडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नणंद व दोन अल्पवयीन नातेवाइकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखलकेला आहे.

बातम्या आणखी आहेत...