आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळातून दोन चोरट्यांना अटक केली. ते अट्टल चोरटे असून, त्यांनी घरफोडीचे चार, दुचाकी चोरीचा एक तर दुकानात चोरी केल्याचा असे एकूण सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सहा गुन्ह्यातील २ लाख ८८ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याच चोरट्यांचा एक साथीदार पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. प्रवीण गणेशराव राऊत (३६, रा. हिवरा कावरे, ता. देवळी, जि. वर्धा) व अतुल राजू चांदेकर (३२, रा. आठवडी बाजार, यवतमाळ) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावण्याकरिता व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्ह यांनी एक पथक नेमले आहे. ३ मार्चला स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय मोहम्मद तस्लीम व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. दत्तापुर ठाण्याच्या हद्दीतील श्रीविहार कॉलनी, न्यू राठी नगर, धामणगाव रेल्वे येथील चोरी गेलेली दुचाकी प्रवीण राऊत याने त्याच्या साथीदारासोबत चोरल्याची माहिती मिळाली. दोघांच्या चौकशीनंतर त्यांनी फरार साथीदारासह धामणगाव रेल्वे येथील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच धामणगाव रेल्वे येथील न्यु राठी नगर, खेतान नगर, वेद विहार लक्ष्मी नगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली व दुकानात चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यवतमाळ, वर्धा, अकोला येथे खून, घरफोडी, जबरी चोरी व दुचाकी चोरीचे गुन्हे आहेत. नमूद आरोपीतांकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून आरोपीतांनी अमरावती शहर, यवतमाळमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, मोहम्मद तस्लीम शेख गफुर, मुलचंद भांबुरकर, पोलिस हवालदार मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मांगे, चालक हर्षद घुसे या पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.