आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवरच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात अलर्ट:सर्व टीएमओंना पत्र लसीकरणासाठी आरोग्य विभागाची स्वतंत्र मोहीम

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, नाशिक व नागपुरमध्ये गोवरचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दक्ष झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणासाठी स्वतंत्र मोहीम आखण्यात आली आहे.

तसेच, ज्या बालकांचा दुसरा डोस अजूनही बाकी आहे, अशा बालकांना या मोहीमेंतर्गत गोवर-रुबेलाचा डोस देण्यात येईल. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह (टीएमओ) खासगी डॉक्टरांच्या संघटनेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

अशी आहेत लक्षणे

कधी-कधी जीवघेणा ठरणाऱ्या गोवरची लागण मुंबई ते नागपुर अशी पसरली आहे. त्या ठिकाणी काही रुग्ण नोंदविले गेले असून त्यांचा उपचारही सुरू झाला आहे. परंतु तशी वेळ अमरावतीकरांवर ओढवू नये, यासाठी आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. साधारणत: दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना गोवर होतो. त्वचा कोरडी पडून त्यावर ओरखडे दिसणे, तीव्र अंगदुखी व ताप येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे मुलांना ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू करावा लागतो. सध्या जिल्ह्यात अशा पद्धतीचे तीनच रुग्ण आढळून आले. अचलपुर उपजिल्हा रुग्णालयांतर्गत एक व अंजनगाव सुर्जी रुग्णालयांतर्गत दोन अशी त्या रुग्णांची विभागणी आहे. हे तिन्ही रुग्ण दोन वर्षे वयाच्या आतील असून त्यांच्यावर योग्य उपचार केते जात आहे.

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी

जन्मानंतर नवव्या महिन्यात पहिला तर अठराव्या महिन्यात दुसरा असे गोवर-रुबेलाचे दोन डोस प्रत्येकाला दिले जातात. आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जन्माला आलेल्या बालकांपैकी 98 टक्के बालकांचा पहिला डोस आटोपला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 85 टक्क्यांवरच थांबली आहे. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याचवेळी ही सूचना जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांच्या संघटनेला करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या मते लसीकरण शंभर टक्केच होणे अपेक्षित आहे. परंतु ते 95 टक्क्यांपेक्षा कमी असू नये, असे सदर विभागाचे म्हणणे आहे.

खासगी डॉक्टरांनाही दिल्या सूचना

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व इतर पुरक यंत्रणांना दक्षतेचा इशारा देत लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्यांचीही मोजदाद व्हावी, यासाठी त्यांच्या संघटनांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसीएशनसह (आयएमए) इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन त्यांनाही याबाबत विनंती करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...