आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत पुन्हा पाऊस:उद्यापासून तीन दिवस लावणार हजेरी; अनेक ठिकाणी मुसळधार बरसण्याची शक्यता

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन दिवसांपासून पावसाने कुठे उघड दिली, त्यामुळे पीक परिस्थिती सुधारत असतानाच पुन्हा उद्यापासून 20 ते 22 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. यावेळी काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

काळजी घ्यावी

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच 20 ते 22 ऑगस्ट 2022 या दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस, एक ते दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि एक ते दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात आकाश ढगाळ राहील. या काळात शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

शेतीची कामे पुढे ढकलावी

पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकामध्ये पाणी साचून राहणार याची दक्षता घ्यावी. आवश्यकता भासल्यास खोदलेल्या चरांद्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. भाजीपाला आणि फळबाग पिकाला पिक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. संत्रावर्गीय फळबागा मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या दिशेने व दोन ओळीनंतर 30 सेंमी खोल, 30 सेंमी खालची रुंदी व 45 सेंमी वरची रुंदी या आकाराचे चर खोदावेत. झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहू नये म्हणून आळे व दांड सपाट करून घ्यावेत. कृषी रसायनांची फवारणी, कामे पाऊसाच्या उघडीप नंतर करावीत किंवा पुढे ढकलावीत.

हवामान खात्याने दिली माहिती

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या, व इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा), अमरावतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह आणि जिल्हा कृषी हवामान केंद्र येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे, कृषी हवामान निरीक्षक व्ही. बी. पोहरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...