आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील वर्षी ३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या राज्य बाल नाट्य स्पर्धेसाठी यावर्षी अक्षरश: उड्या पडल्या असून तब्बल ४० नाटकांची नावे अंतिम यादीत समाविष्ट झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अमरावतीत प्रौढांच्या नाटकांपाठोपाठच राज्य शासनातर्फे बाल नाट्य स्पर्धाही घेतली जात आहे.
या स्पर्धेसाठी अलिकडेच नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये नामवंत लेखक-दिग्दर्शक आणि कसदार अभिनय करणाऱ्या बाल नाट्यकर्मींचा समावेश असलेल्या ४० नाटकांची नावे समाविष्ट झाली आहेत. या नाटकांचा क्रम अद्याप निश्चित व्हावयाचा आहे. परंतु आयोजकांनी तशी पूर्वतयारी केली असून, राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून यादी प्राप्त होताच घोषणा केली जाणार आहे.
नाटकांच्या यादीत नातं, आम्ही नाटक करत आहोत, खादाड, खेळ मदारिवाल्याचा, काबुलीवाला, पुस्तक न आवडणारी मुलगी, लहानपण देगा देवा, ९९% काठावर पास, जय हो फॅन्टसी, कस्तुरी, ग्रेटाची हाक, आजोबा आणि लाल टी-शर्ट, कुप्पीतलं गुपीत, राखेतून उडाला मोर, तेजोमय, आम्ही ध्रुव उद्याचे, खरा तो एकचि धर्म, एकला चलो रे, नवे गोकुळ, अँड्राईड, ढोंगी बाबा, अनाथ, एक होती म्हातारी, खेळाचे टपाल, काळोख, बुलेट ट्रेन, एक नबाब, सिंगगडाला जेव्हा जाग येते, पृथ्वी, नो टू वर्ल्ड भटकंती, काही चुकल्यास क्षमस्व, नाटक नाटक खेळताना, क्षितिजाच्या पलिकडे, मयुरी आणि सोनपरी, उस्मानची आई, जादुचा शंख, सत्यम शिवम सुंदरम, प्लॉट नं. शून्य, जाईच्या कळ्या अशा एकाहून एक सरस नाट्यकृतींचा समावेश आहे. तर नाटकाच्या लेखकांमध्ये सई परांजपे, मंजुश्री गोखले, विजय डुकरे, मंजुषा करमरकर, गोविंद गोडबोले, धनंजय सरदेशपांडे, आसिफ अन्सारी, सदानंद देशपांडे, किशोर पाचकवडे, डॉ. श्याम देशमुख, विवेक राऊत, यतीन माझोरे, केशव बेडणेकर, श्रीकांत देशमुख, गणेश वानखडे, प्रमोद काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, मंगेश बक्षी, राज कानिटकर, चैतन्य सरदेशपांडे यासारख्या स्थानिक नामवंतांसह पु. ल. देशपांडे या ऐतिहासिक नाट्यकर्मीच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी शहरासह जिल्ह्यातील बालनाट्य कलाकार व नाट्यप्रेमींमध्ये उत्साह आहे.
अमरावती केंद्रावर होणार प्राथमिक फेरी
एकोणविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अमरावती केंद्रावर होणारी ही प्राथमिक फेरी आहे. यातील सर्व नाटके मराठी भाषेतील असून स्थानिक कलावंत व दिग्दर्शकांनीच त्यात प्राण ओतला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या प्रौढांच्या नाटकांसारखाच प्रतिसाद बालनाट्य स्पर्धेलाही मिळेल, अशी अपेक्षा समन्वयक अॅड. चंद्रकांत डोरले आणि सहसमन्वयक दिलीप फाटे यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.