आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीतील माल भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याला ‘एपीएमसी’ प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या शेतकरी पुत्रांनी ‘एपीएमसी’वर धडक दिली. यावेळी तत्काळ पंचनामे करून १५ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या रोषाला तयार राहावे, असा इशाराही यावेळी संतप्त शेतकरी पुत्रांनी दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
१८ जून रोजी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये हजारो क्विंटल चना, सोयाबीन, तूर आदींचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागला. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालासाठी शेड (गोदाम) आहेत. मात्र, या शेड मध्ये बहुतांश व्यापाऱ्यांचा खरेदी केलेला माल आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच भविष्यात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्यास कोटी रुपयांचा विमा काढण्यात येतो, मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, पंचनामे करतांना कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव वगळण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी पुत्रांनी ‘एपीएमसी’ प्रशासक राजेश लव्हेकर यांना निवेदनातून दिला आहे.
यावेळी सोपान गुडधे, शेखर औगड, उमेश महिंगे, सुधीर बोबळे, समीर जवंजाळ, अनिकेत जावरकर, विजय मंडाले, विकास देशमुख, किरण महल्ले, दिनकर सुंदरकर, अमोल भारसाकडे, अक्षय साबळे, प्रवीण मोहोड, सत्यजित राठोड, उमेश वाकोडे, संकेत भुगुल, अजिंक्य वानखडे, योगेश देशमुख, शाम गवळी, यशवंत गुडधे, राजेंद्र तायडे, रंजित तिडके, रंजित खाडे, अनुप सहारे आदी शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.