आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम:जुनी भांडी नवी करून देण्याचा बहाणा करत सोन्याचे दागिने केले लंपास

धामणगाव रेल्वेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या दोन फेरी वाल्या महिलांनी शहरातील दोन गृहिणींचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघड झाली. शिवाजी वॉर्डमध्ये ही घटना घडली. दरम्यान, दागिने पळवणाऱ्या त्या दोन्ही महिलांचा दत्तापूर पोलिसांकडून शोध सुरू असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील ज्योती विलास भाकरे (वय ४८) या शिवाजी वॉंर्ड येथील सन्मान लॉजच्या मागे राहतात. त्यांचे पती व मुलगा सुमित सकाळी आठ वाजता मजुरीच्या कामाने घराबाहेर पडल्यानंतर घरी दिवसभर त्या एकट्या असतात. मागील चार-पाच दिवसांपासून त्यांच्या शिवाजी वॉर्ड परिसरात जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडे करून देणाऱ्या दोन महिला फिरत होत्या. दरम्यान, या दोन्ही महिला ज्योती भाकरे यांना भेटून तुमच्या घरात असलेल्या जुन्या वस्तू आम्हाला द्या, त्यावर आम्ही त्या नवीन करून तुम्हाला परत देऊ व सोबत एक भेटवस्तू सुद्धा देऊ, असे बोलू लागल्या. सुरुवातीला घरातील सहा जुनी स्टील ग्लास दिल्यावर त्यांनी ते नवीन ग्लास दिले व भेट वस्तू म्हणून परत एक अल्युमिनीअमचा डबासुद्धा आणून दिला. त्या फेरी वाल्या महिलांवर ज्योती भाकरे व परिसरात असलेल्या इतरही गृहिणींचा विश्वास बसल्याने घरातील जुनी भांडी देऊन नवीन भांडी घेऊ लागल्या.

दरम्यान, २९ ऑक्टोबरला शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान त्या दोन्ही फेरी वाल्या महिला पुन्हा शिवाजी वॉर्ड परिसरात आल्या. ज्योती भाकरे यांच्याशी बोलणे सुरु असतानाच शेजारी राहत असलेल्या किरण रोकडे यांनी मला दहा हजार रुपयांची गरज असल्याचे असे त्या दोघींना सांगितले. त्यावर आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये आणून देतो, तुम्ही तुमच्याकडील दागिना द्या, असा पर्याय त्या दोघींनी सूचवला. त्यामुळे किरण रोकडे यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून त्यांना दिले. त्याचवेळी ज्योती भाकरे यांनीसुद्धा पैशाची गरज असल्याने घरातील सोन्याच्या दोन पोथ, ज्यामध्ये ११ ग्रॅमचे डोरलेमणी असून त्याबदल्यात पंचवीस हजार रुपयांची मागणी केली. या महिलांनी ही मागणी मान्य करत दुपारी ४ वाजेपर्यंत पैसे आणून देतो असे सांगितले. परंतु नंतर त्या परतल्याच नाहीत.

२९ ऑक्टोबरचा दिवस लोटल्यावरही त्या फेरीवाल्या दोन महिला परत न आल्याने ज्योती भाकरे व किरण रोकडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दत्तापूर पोलिस स्टेशन गाठले. यावेळी ज्योती भाकरे व किरण रोकडे यांचे एकूण २१ ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजित किंमत ८५ हजार रुपये) लुटून नेल्याच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तापूर पोलिसांनी निमगोरा रंग, दणकट बांदा, कुरळे केस, परदेशी पदराची साडी नेसून असलेल्या व सळपातड बांधा, रंग काळा व महाराष्ट्रीयन साडी नेसून असलेल्या एकमेकींना देराणी-जेठाणी म्हणून सांगणाऱ्या छत्तीसगढ प्रांतीय हिंदी भाषिक त्या दोन महिलांचा शोध सुरू केला आहे. ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात दत्तापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...