आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी:लम्पी : केंद्रीय पथक उद्या अमरावतीत

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरांवर अचानक ओढवलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे तीन सदस्यीय पथक बुधवार, २३ नोव्हेंबरला जिल्ह्यात येत आहे. हे पथक जिल्ह्यातील काही गावांना भेटी देणार असून तेथील वास्तविक परिस्थिती जाणून घेणार आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशुसंवर्धन विभागाचे दिल्ली येथील प्रादेशिक अधिकारी विजयकुमार, बंगळुरू येथील शास्त्रज्ञ मंजुनाथ रेड्डी व पुण्याचे सहायक आयुक्त सुनील लहाने असे हे तीन सदस्यीय पथक आहे. अमरावतीसह राज्यात संसर्ग ज्या-ज्या जिल्ह्यात पसरला, त्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करून हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सोपवणार आहे.

दौऱ्यादरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांकडूनही माहिती संकलित केली जाईल. लम्पीचा उद्भव, संसर्ग, त्यामुळे झालेले मृत्यू आणि गुरांच्या मालकांना देण्यात आलेली मदत अशा सर्वच मुद्यांची चौकशी केली जाईल. शासकीय यंत्रणा अजूनही सर्वांपर्यंत पोहोचू शकली नाही. सदर भेटीदरम्यान या सर्व मुद्यांची पडताळणी होईल.

अधिकाऱ्यांकडून दुजोरा
केंद्रीय पथक बुधवारी अमरावतीत दाखल होण्याच्या माहितीला संबंधित अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला. उपायुक्त डॉ. संजय कावरे यांच्या मते पथकातील सदस्य सध्या कोणत्या गावात किती वाजता जाईल, हे ठरवले नाही. त्याबाबतची आखणी मंगळवारी केली जाणार आहे. दरम्यान लसीकरणामुळे संसर्ग घटला असून गुरांचा मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

जिल्ह्यात १८८२ मृत्यू
लम्पीमुळे आतापर्यंत जिल्ह्यात १,८८२ गुरांचा मृत्यू झाला. यापैकी १.४०५ गुरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात आली. मृत जनावरांपोटी त्यांच्या मालकांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जाते. गाय आणि म्हैस मृत झाल्यास ३० हजार रुपये, बैल मृत झाल्यास २५ हजार आणि वासरू मृत झाल्यास १६ हजार रुपये मदत दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...