आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दीड वर्षांपूर्वी डुप्लिकेट चाव्या बनवल्या, आता कर्ज फेडण्यासाठी अडीच लाख चाेरले

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राजापेठ परिसरातील एका संगणक साहित्य विक्रीच्या दुकानात दिड वर्षांपूर्वी काम करत असलेल्या नोकराने त्याचवेळी दुकानाच्या कुलपांच्या बनावट चाव्या तयार केल्या होत्या. याच चाव्यांचा वापर करुन शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्री त्याने दुकानात प्रवेश करुन अडीच लाखांची रोख चोरली. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत शुक्रवारी (दि. १९) चोरट्याला अटक केली. ऑनलाइन काढलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

मंगेश विनोदराव मारोडकर (२२, रा. वडगाव जिरे, पारडी, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. राजापेठ परिसरातील गुलशन कॉम्प्लेक्समध्ये ‘सुपर कॉम्प्युटर’ नामक दुकान आहे. याच दुकानात मंगेश दिड वर्षांपूर्वीपर्यंत काम करत होता. त्याने सुमारे तीन वर्ष या दुकानात काम केले. त्यावेळी अनेकदा दुकान बंद करतेवेळी तो दुकानांची कुलपे लावत होता. त्यामुळे दुकानाच्या चाव्या त्याच्याजवळ राहत होत्या. याचदरम्यान त्याने खऱ्या चाव्यांद्वारे बनावट चाव्या तयार करुन ठेवल्या होत्या.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री दुकान मालक अजय शंकरलाल बुढलानी यांनी दुकानाला कुलूप लावून बंद केले. शुक्रवारी (दि. १९) सकाळी दुकानात येऊन पाहिले असता दुकानाचे कुलूप उघडे असून काऊंटरमधून अडीच लाख रुपयांची रोख तसेच सीसीटीव्ही मधील हार्डडिस्क चोरीला गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार मनिष ठाकरे पथकासह घटनास्थळी पोहोचले. दुकान मालकाने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी मंगेश दुकानात आला व त्याने काम मागितले. मात्र त्यावेळी त्याला काम दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी संशयाच्या आधारे मंगेशला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी ही चोरी केल्याचेही त्याने सांगितले, अशी माहिती राजापेठचे ठाणेदार ठाकरे यांनी दिली आहे.

रात्री चोरी केली अन् सकाळी एक लाखाचे कर्ज चुकवले
मंगेशने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन कर्ज काढले होते. कर्जाचा वेळीच भरणा न झाल्यामुळे कर्ज देणाऱ्यांनी त्याचा मानसिक जाच सुरू केला होता. त्याच्या नातेवाईकांना मेसेज पाठवून त्याची बदनामी सुरू केली होती. त्यामुळेच त्याने चोरी केली. त्याने चोरलेल्या अडीच लाखांच्या रोख पैकी शुक्रवारी सकाळीच पोलिस त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच एक लाख कर्ज देणाऱ्या कंपनीला देऊन कर्ज चुकवले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...