आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाहाला विरोध:अमरावतीत मुलीला माहेरच्यांनी फरफटत नेले; पतीची पोलिसांत तक्रार, मुलीचा शोध सुरू

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीला असे फरफटत नेल्याचे दिसून आले.

मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा गावातील एका २२ वर्षीय युवकाने तालुक्यातील १९ वर्षीय युवतीसोबत २८ एप्रिलला आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. दरम्यान, ४ मे रोजी मुलीचे माहेरकडील नातेवाईक आले व त्यांनी मुलीला पतीच्या घरातून अक्षरश: फरफटत नेले, असा आरोप करून पतीने मोर्शी पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन विवाहित महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली असून मुलीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तो याच प्रकरणाचा असल्याची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.

२२ वर्षीय युवक व १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २८ एप्रिलला या दोघांनी अमरावती शहरातील आर्य समाज मंदिरात विवाह केला. तसे विवाह प्रमाणपत्रसुद्धा युवकाकडे आहे.

दरम्यान, लग्नानंतर मुलगी तिच्या पतीकडे अंबाडा येथे राहत होती. ४ मे रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या माहेरील काही मंडळी अंबाड्यात त्या युवकाच्या घरी पोहोचली. या वेळी त्यांनी मुलीला सोबत आपल्या घरी चलण्यासाठी आग्रह केला. मात्र मुलगी त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती. त्या वेळी माहेरच्या लाेकांनी अक्षरश: तिला पतीच्या घरातून फरफटत नेले. नेमके तिला कुठे नेले याबाबतही माहिती दिली नाही. त्यामुळे मुलीच्या पतीने तत्काळ या प्रकरणाची माहिती मोर्शी पोलिसांना दिली. मोर्शी पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे. मात्र शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत मोर्शी पोलिस मुलीपर्यंत पोहोचले नव्हते. दरम्यान, नेमका प्रकार मुलीच्या जबाबानंतर समोर येईल, त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुलीला काही व्यक्ती जबरीने फरफटत नेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

तक्रार प्राप्त, मुलीचा शोध घेतला जात आहे
प्रेमविवाह केल्यानंतर मुलीला तिच्या माहेरच्या मंडळींनी जबरीने घरातून नेले आहे. नेमके कुठे नेले याबाबत आपल्याला माहिती नाही, अशी तक्रार युवकाने दिली आहे. त्या आधारे चौकशी सुरू आहे. मुलीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. तिच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- राम लांबाडे, ठाणेदार, मोर्शी.

बातम्या आणखी आहेत...