आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन वैभवात भर:महेंद्री वनक्षेत्र होणार अभयारण्य; समितीचा महिनाभरात अहवाल

अमरावती7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालतानाच वन पर्यटनावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे एक नवे अभयारण्य लवकरच अस्तित्वात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याबाबतची अधिसूचना जारी झाली असून, शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली १५ सदस्यीय समिती व चार सदस्यीय उपसमिती गठित करण्यात आली आहे. या समितीला महिनाभरात अहवाल सादर करावयाचा आहे.

नवे अभयारण्य मध्य प्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यात महेंद्रीच्या जंगलात उभे होत आहे. या जंगलाची एकूण व्याप्ती ६५.५२ चौरस किलोमीटर असून त्यामध्ये मोठी वनसंपदा व वन्यप्राण्यांचा आढळ असल्याचे सिद्ध झाले आहे. महेंद्रीच्या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्याची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींनी फार पूर्वीपासूनच पुढे रेटली होती. विशेष असे की या अभयारण्यात मानवी वस्ती असलेल्या एकाही गावाचा समावेश नसून ते पूर्णत: जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे कुणीही बाधित होण्याचा प्रश्नच उद्भवत नसून उलट शेजारच्या गावांतील नागरिकांना वन पर्यटनाच्या आधारे रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत.

शासनाने सध्या या क्षेत्राला ‘महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. तशी अधिसूचना १३ सप्टेंबर २०२१ रोजीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता अभयारण्य घोषित करण्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. यादृष्टीने येथील मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी ७ जानेवारी रोजी एक पत्र जारी करुन १५ सदस्यीय समितीचे गठन केले आहे. ही समिती प्रस्तावित क्षेत्रावरील स्थानिक लोकांचे हक्क व सवलती, स्थानिकांची गुरेचराई, बांबू, जळाऊ लाकूड, गौण वनोपज, स्थानिकांच्या उपजीविकेच्या संधी, वानिकीवरील अवलंबन आदींचा अभ्यास करणार असून अभयारण्य झाल्यानंतर काय-काय बाधित होणार, त्यासाठी स्थानिकांची सहमती तयार करणे तसेच पुनर्वसन करावयाचे असल्यास अंदाजे किती जमीन व किती रक्कम लागेल, याचाही आढावा घेणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या चार सदस्यीय उपसमिती मार्फत अंतीम अहवाल दिला जाईल. या उपसमितीचे सदस्य सचिव उप वनसंरक्षक असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य प्रा. किशोर रिठे व यादव तरटे हे अशासकीय सदस्य आहेत. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ही उपसमिती गठित केली आहे.

काय आहे महेंद्री वनक्षेत्रात ?
वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांनी गोळा केलेल्या माहितीनुसार महेंद्री वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानकुत्रे, अस्वल इत्यादी दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आणि २१२ प्रजातीचे पक्षी आढळून येतात. हे वनक्षेत्र जैवविविधतेने संपन्न असे जंगल असून वरुड परिसरातील नदी, नाले यांना पाणी देण्याचे अर्थातच नदी-नालांच्या प्रवाह अखंडित राहिल, यासाठीचे हवामान टिकवून ठेवण्याचे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.

….तर महाराष्ट्राच्या वनक्षेत्रातही वाढ : वनक्षेत्राच्यादृष्टीने तसेही महाराष्ट्राचे व्यस्त प्रमाण आहे. भौगोलिक रचनेच्या तुलनेत जेवढे वनक्षेत्र पाहिजे, तेवढे येथे नाही. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे विदर्भात, विशेषत: जिल्ह्यात मेळघाटच्या रुपाने मोठे वनक्षेत्र आहे. महेंद्री अभयारण्यामुळे त्यात आणखी वाढ होणार असून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर एक मोठे वन पर्यटन केंद्र जन्माला येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प (चिखलदरा-धारणी तालुक्याचा भाग आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान) सोडून दुसरे कोणतेही अभयारण्य अस्तित्वात नाही. त्यामुळे महेंद्री वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यास जिल्ह्यात दोन अभयारण्ये अस्तित्वात येतील. विशेष असे की ही दोन्ही अभयारण्ये सातपुडा पर्वतरांगेला जोडली जात असून दोन्हीही मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना फायदाच होईल. विशेष असे की त्यादृष्टीने चाचपणी झाली असून आमची चार सदस्यीय उपसमिती सर्वच मुद्द्यांचा आढावा घेत आहे. सदर समितीला गठनानंतर दोन महिन्यात अहवाल सादर करावयाचा होता. त्यापैकी एक महिना लोटला असून आगामी महिनाभरात समितीचे कामकाज पूर्णत्वास जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...