आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य सिकची, प्रा. रघुवंशी, अविनाश बोर्डे विजयी:सिनेटमधून व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या सातही जागा ‘नुटा’च्या ताब्यात

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमधून व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या सातही जागा जिंकून नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशनने प्रतिस्पर्धी अभाविप-शिक्षण मंचला मोठा धक्का दिला आहे. सदर सात जागांसाठी आज, मंगळवार, १४ मार्चला निवडणूक पार पडली. दुपारनंतर निकाल घोषित करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेसह विद्वत परिषद आणि विद्यार्थी कल्याण निधीच्या प्रत्येकी एक, तक्रार निवारण समिती व शिक्षक कल्याण समितीच्या प्रत्येकी दोन आणि स्थायी समितीच्या तीन जागांसाठीही याच सभेत निवडणूक घेण्यात आली.

सिनेटच्या रितसर गठनानंतर आज, मंगळवारी पहिली सभा घेण्यात आली. सिनेटवरुन व्यवस्थापन परिषदेवर आठ सदस्य निवडावयाचे असतात. यापैकी प्राचार्य मतदारसंघातील एसटी संवर्गाची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे उर्वरित सात जागांसाठी आजच्या सभेत मतदान घेण्यात आले.

यापैकी चार जागा अ‌विरोध निवडल्या गेल्या. तर तीन जागा प्रत्यक्ष मतदानाअंती विजयी घोषित करण्यात आल्या. विजयी उमेदवारांमध्ये पदवीधरांचे प्रतिनिधी अविनाश बोर्डे (४३), प्राध्यापक संवर्गातील नुटा चे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी (४२) आणि प्राचार्य संवर्गातील डॉ. आर.डी. सिकची (३९) यांचा समावेश आहे. या तिघांनीही अनुक्रमे अमोल ठाकरे (२४), प्रा. डॉ. संतोष कुटे (२६) व प्राचार्य डॉ. संजय खेरडे (२९) यांचा पराभव केला. मतदानाच्या प्रक्रियेत सर्व ६९ सदस्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये स्वत: कुलगुरुंचाही समावेश आहे. अर्थात ते या अधीसभेचे सदस्य आहेतत. परंतु प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेणारे ते पहिले ठरले.

दरम्यान नामांकनाची प्रक्रिया आणि माघार घेण्यादरम्यान अविरोध विजयी झालेल्यांमध्ये शिक्षण संस्थांच्या संचालकांचे प्रतिनिधी हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य संवर्गातील डॉ. विजय नागरे, प्राध्यापक संवर्गातील प्रा. हरिदास धुर्वे व पदवीधरांचे प्रतिनिधी भय्यासाहेब मेटकर यांचा समावेश आहे. निकाल घोषित झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आणि ‘नुटा’चे संस्थापक माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या निवास्थानासमोर फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला.

विद्वत परिषद, स्थायी समितीचीही निवडणूक

व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या सदस्यांसह विद्वत परिषद आणि इतर चार समित्यांवर पाठवावयाच्या सदस्यांची निवणुकही मंगळवारच्या सभेत करण्यात आली. त्यानुसार विद्वत परिषदेवर डॉ. अशोक चव्हाण (५६) विजयी झाले. दरम्यान स्थायी समितीमध्ये प्राचार्य डॉ. डी. आर. गावंडे (३६), प्राध्यापक डॉ. एस. पी. गावंडे (३८) व पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून नितीन टाले (३५) विजयी झाले असून शिक्षक कल्याण समितीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे (३६) आणि प्राचार्य डॉ. निलेश गावंडे (३६) विजयी झाले आहेत. याशिवाय विद्यार्थी कल्याण समितीवर डॉ. विजय कापसे (३२) हे एकसमान मते मिळाल्याने इश्वरचिठ्ठीने विजयी झाले.

बातम्या आणखी आहेत...