आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रॅक्टरद्वारे मुरूम वाहतूक करू देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्यासह कोतवालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुना धामणगाव येथील मंडल अधिकारी यांच्या कार्यालयातच करण्यात आली.मंडल अधिकारी देविदास रामचंद्र उगले (५६) व कोतवाल राहुल साहेबराव तायडे (३२) अशी अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
या प्रकरणातील २५ वर्षीय तक्रारकर्त्यांला आपल्या हद्दीत ट्रॅक्टरद्वारे मुरूम वाहतूक करू देण्यासाठी मंडल अधिकारी देविदास उगले यांनी कोतवाल राहुल तायडे यांच्या माध्यमातून ३० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी झाली. पडताळणीत तडजोडी अंती मंडल अधिकारी देविदास उगले व कोतवाल राहुल तायडे यांनी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
त्यानुसार सापळा रचण्यात आला. कार्यालयातच तक्रारकर्त्याकडून लाचेची २० हजारांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडल अधिकारी देविदास उगले व कोतवाल राहुल तायडे या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध धामणगाव रेल्वे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.