आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती बंद:मनपात आरक्षित 59 पदे रिक्त; केवळ अनुकंपा तत्त्वावरीलच पदांची भरती; कल्याण समितीला उत्तर द्यावे लागणार?

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडूनच महानगरपालिकेतील सरळ सेवा भरती बंद असल्याने केवळ अनुकंपा तत्त्वावर राखीव संवर्गातील जी पदे भरण्यात आली तेवढीच, अन्यथा इतर राखीव पदे रिक्त आहेत.

भटक्या विमुक्त जाती व जमातीची तृतीय व चतुर्थ श्रेणीतील ५९ पदे रिक्त आहेत. यात सरळ सेवेने भरल्या जाणाऱ्या तृतीय श्रेणीतील ३२ तसेच पदोन्नतीच्या ८, चतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरतीच्या ९ आणि पदोन्नतीच्या १० पैकी १० जागांचा समावेश आहे. तृतीय श्रेणीतील एकूण ७४ तसेच चतुर्थ श्रेणीतील ९१ जागा भटक्या विमुक्त जाती व जमातीसाठी मंजूर आहेत. या एकूण १६५ होतात. त्यापैकी १०६ जागाच भरण्यात आल्या असून ५९ जागा रिक्त आहेत.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगामी काही दिवसांत येणारी विमुक्त जाती व जमाती कल्याण समिती मनपाला या जागा कशा रिक्त राहिल्या याबाबत विचारणा करण्याची शक्यता असल्यामुळे मनपानेही त्यांचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे. मनपाच्या आस्थापनेवर १७०० पदे असून त्यापैकी या संवर्गासाठी १६५ पदे आहेत. त्यापैकी ५९ पदे रिक्त का? यामागील कारण ही समिती जाणून घेणार आहे.

महानगरपालिकेचा आस्थापना खर्च ५० टक्क्यांच्या वर गेल्यामुळे शासनाकडून नव्याने पद भरतीची मंजुरी मिळणे शक्य नाही. त्यामुळेच या राखीव संवर्गासह इतरही संवर्गातील पदे रिक्त असून कामाची गती मंद होऊ नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर ती तात्पुरती भरण्यात आली आहेत.

महानगरपालिकेत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, त्यांची पदे गेल्या काही वर्षांपासून भरलीच जात नसल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. अनेकांकडे प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामाची गती ही हवी तेवढी वाढली नाही. अशात जर विमुक्त व भटक्या जातींची पदे का भरण्यात आली नाहीत यावरून कल्याण समिती मनपाला जाब विचारण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...