आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेळघाटातील आदिम जीवन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या फगवा महोत्सवाचा समारोप रविवार १२ रोजी झाला. पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कोठा येथील ग्रामज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्रात आयोजित या दोन दिवसीय महोत्सवाला राज्यभरातून कलाप्रेमींनी भेट दिली. समारोपाच्या सत्रात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ऑनलाईन उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले. मेळघाटातील आदिवासी संस्कृती, तेथील पारंपारिक कला, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी फगवा महोत्सवाचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
निसर्गसंपन्न मेळघाटातील आदिवासी संस्कृती, आदिवासी बांधवांची कला यांचे प्रदर्शन व त्यांच्याद्वारे निर्मित हस्तकलेच्या वस्तूंना अन्यत्र मागणी वाढावी, यासाठी पुढील वर्षी फगवा महोत्सव अधिक व्यापक स्वरुपात साजरा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डिसेंबरमधील अमरावती दौऱ्यात फगवा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा पर्यटनमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या दोन दिवसीय महोत्सवात आदिवासी संस्कृतितील गाणी, नृत्य, कला यासोबतच विविध वस्तू, बांबूपासून तयार विविध कलाकृती, मेळघाटात उत्पादित धान्याच्या दालनांचा समावेश करण्यात आला होता. धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, धारणीचे नायब तहसीलदार शिरीष वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव खडसे, कोठाच्या सरपंच रुखमा कासदेकर, केंद्राच्या अध्यक्ष निरूपमा देशपांडे तसेच पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई़ यावेळी उपस्थित होते.
पारंपरिक लोकनृत्याने आणली बहार महोत्सवात कोरकू, गोंड, गवळी, भिलाला या विविध संस्कृतींची पारंपरिक लोकनृत्य व लोकगीते सादर करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात जंगल सफारी, निसर्ग भ्रमंतीबरोबरच परिसंवादही घेण्यात आला. आदिवासी कलावंतांचा ‘सन्मान सोहळा’ही यावेळी आयोजित करण्यात आला. यामध्ये आदिवासी बांधवांना मान्यवरांच्या हस्ते धोतर, साडी, चोळी व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.