आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुक:अनेकांची स्वबळावर लढण्याची तयारी; शहर कार्यकारिणी घोषित करण्याचा सपाटा ; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा निवडणुकीची तारीख अद्याप घोषित झाली नसली तरी शहरातील राजकीय पक्षांमध्ये कमालीची सक्रियता वाढली असून, आपली क्षमता दाखवण्यासाठी पक्षांनी मोठ्या कार्यकारिणीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकच पक्ष स्वबळावर मोर्चे बांधणी करत आहे. मागून घोडे दामटण्यात दमछाक होते. याची जाण असल्यामुळे आतापासूनच सर्व पक्षांनी सज्जता ठेवली आहे. २०१७ मध्ये मनपा निवडणूकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपची कार्यकारिणी तयार आहे. नुकतीच शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मोठी कार्यकारिणी घोषित केली. शिवसेनेची तर आधीपासूनच तयारी आहे. एमआयएम तसेच रिपाइंनेही जोरदार तयारी केली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा स्वाभिमान, एमआयएम, रिपाइं, बसपा हे पक्ष सध्या कार्यकर्ते व पदाधिकारी जास्तीत जास्त संख्येत कसे जोडता येतील, याचाच विचार करून कामाला लागले आहेत. कारण जेवढी मोठी कार्यकारिणी असेल तेवढी शक्ती वाढेल, असे प्रत्येकालाच वाटत आहे. बड्या पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार शहर अध्यक्षांनी इच्छुकांना कसे रिझविता येईल, यासाठी पत्ते टाकण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात आघाडी किंवा युती झाली नाही तर आपण कुठेही मागे राहता कामा नये. या दृष्टीने पुढे जाण्यासाठी प्रत्येकच पक्ष सज्ज आहे. ५० टक्के आरक्षणासह तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे यंदा महिलांना उत्तम संधी मिळाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये महिलांचेही वजन वाढत असल्याने महिला कार्यकारिणीही मजबूत करण्यात आली आहे. रिपाइं, संयुक्त रिपब्लिकन आघाडीसोबत : रिपब्लिकन पक्षाला मनपा निवडणुकीत युती करण्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत. जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष व संघटनांनी संयुक्त आघाडी स्थापन केली असून, त्या आघाडीसोबत रिपाइं राहणार असल्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डा‌ॅ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. त्यांनी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद मिटवावे, असेही म्हटले आहे.

बहुतेक पक्ष आपसातील वाद मिटवण्यात व्यस्त

महानगरपालिकेच्या निवडणुकीला सध्या काही वेळ असल्यामुळे बहुतेक पक्ष आपसातील वाद मिटवण्यात व्यस्त आहेत. तसेच पक्षनेतेही एकमेकांसोबत मतभेद, हेवेदावे ठेवू नये, असे आवाहन करताना दिसत आहेत. कारण प्रत्येकच पक्षाला यंदाची मनपा निवडणूक ही अस्तित्व दाखवण्याची नामी संधी वाटत आहे. त्यामुळे आपसातील वाद मिळले तर पक्षाची क्षमता वाढेल, एकता कायम राहील, हाच यामागील उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...