आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक:अनेक दिग्गजांचं ‘बिनसलं’, काहींचं ‘जमलं’ ; पुरुषांच्या वाट्याला 48 जागा

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ओबीसी (बीसीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग) व खुल्या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. यात ९८ पैकी ५० जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत अनेक दिग्गजांचं संभाव्य राजकारण बिनसलं, तर काहींचं मात्र चांगलंच ‘जमलं’ आहे. काही प्रस्थापित उमेदवारांना इतर ठिकाणी उभे राहून चांगलीच परीक्षा द्यावी लागेल. काहींच्या प्रभागातील त्यांचे खास मतदार इतरत्र गेले असून काहींचे प्रभागच बदलले आहेत. काही प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवारांसाठी आरक्षण असल्यामुळे दोन दिग्गज पुरुषांपैकी एकालाच उभे राहण्याची संधी मिळणार आहे.

महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसुचीत जातीच्या १७ तर अनुसुचीत जमातीच्या २ जागांसाठी आधीच आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्याला धक्का न लावता उर्वरित ७९ जागांसाठी शुक्रवारी आरक्षण काढण्यात आले. त्यात ओबीसीच्या जागा शहरातील लोकसंख्येनुसार नव्हे तर एकूण सदस्यांच्या २७ टक्क्यांप्रमाणे अर्थात २६ जागा काढण्यात आल्या. त्यापैकी १३ महिलांसाठी आरक्षित झाल्या. खुल्या प्रवर्गातील ५३ पैकी २७ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे खुल्या प्रवर्गात पुरुषांसाठी २६ जागा आहेत. मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या नेतृत्वात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त सुरेश पाटील, नगर सचिव मदन तांबेकर, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रारंभी प्रभागाची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांपुढे त्याची सरमिसळ करण्यात आली. मनपा शाळा क्र. १४ वडाळी येथील शबनम कौर मंजिलसिंग टांक, युक्ता राजेश उसरेटे, अंश योगेश प्रधान, नैतिक सुनील धानोरकर यांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या.

या दिग्गजांच्या अडचणी वाढल्या : साईनगर प्रभाग क्र. २९ येथे ओबीसी व सर्वसाधारण महिला अशा दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने माजी महापौर चेतन गावंडे किंवा माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्यापैकी एकालाच उभे राहता येणार आहे. नवाथे-अंबापेठ प्रभागातही ओबीसी व सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आरक्षित असल्याने माजी नगरसेवक प्रणीत सोनी, अजय सारसकर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. दोघेही भाजपचेच उमेदवार आहेत. रामपुरी कॅम्प येथून खंदे पाठीराखे मतदार इतरत्र गेल्यामुळे माजी नगरसेवक दिनेश बुब यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बुधवारा येथून शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांना यावेळी काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विवेक कलोती यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल. या प्रभागातून माजी नगरसेविका सुनीता भेले यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. कारण हा प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित आहे.

बुधवाऱ्यात विलास इंगोले आणि विवेक कलोती हे दोन विरोधी पक्षातील असले तरी मित्र समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता हाेती. परंतु, ओबीसी आरक्षणामुळे दोघांचेही आता चांगले जमलं आहे. दोघांचाही एकमेकांना अडथळा नाही. बेनोडा येथून अविनाश मार्डीकर यांचे खंदे मतदार इतरत्र गेल्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे काही नगरसेवक प्रभागात बदल करू शकतात. किंवा काही त्यांच्या घरातील महिला उमेदवारांनाही संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात अनेक इच्छुकांपुढे मात्र पेच निर्माण झाला आहे.

असे आरक्षण : १) अनुसूचित जाती : १७ जागांपैकी ९ महिलांसाठी. २) अनुसुचीत जमाती : २ जागांपैकी १ महिलांसाठी. ३) ओबीसी : २६ जागांपैकी १३ जागा महिलांसाठी. ४) सर्वसाधारण : ५३ जागांपैकी २७ जागा महिलांसाठी.

बातम्या आणखी आहेत...