आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:84 दिवस पूर्ण झाल्यावरही 2 लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना झपाट्याने वाढत असतानाही 3 लाखांवर नागरिक लसीपासून दूरच!

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असली तरी जिल्ह्यातील सुमारे ३.६४ लाख नागरिक अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीपासून दूर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांचा कालखंड पूर्ण झाल्यानंतरही तब्बल २ लाख नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. वारंवार सूचना व संदेश पाठवूनही हे नागरिक लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी पुढे आले नाहीत.

१८ वर्षांवरील सुमारे २२ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम गेल्यावर्षी तीळसंक्रांतपासून सुरु करण्यात आली. आतापर्यंत १८ लाख ३६ हजार नागरिकांनी पहिला आणि ९ लाख ८७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण उद्दीष्ट लक्षात घेता अद्याप ३ लाख ६४ हजार नागरिक लसीकरणापासून दूर आहेत. सुरुवातीला लसीची कमतरता असल्यामुळे केंद्रावर गर्दी उसळायची. परंतु आता लस मुबलक असतानाही हे नागरिक लसवंत व्हायला तयार नाहीत.

लस घेतल्यानंतर प्रतिकार शक्ती वाढते. परिणामत: कोरोनाची लागण सहजासहजी होत नाही. परंतु याबाबत प्रचंड जनजागरण झाल्यानंतरही ३.६४ लाख लोक लसीकरणाच्या टप्प्यात आले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्याच्या कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ नोंदली जात आहे, असे म्हणायला वाव आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी विशेष अभियान राबवून ३० नोव्हेंबरच्या आत जिल्हा १०० टक्के लसवंत करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुरुप आरोग्य विभागाने आखणीही केली.

दरम्यानच्या काळात ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ होत आहे. त्यामुळे लसीकरणालाही वेग आला असून, येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्याची मोहीम सुरु केली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असून, त्यासाठी प्रारंभीचे काही दिवस आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांवर त्यांना जावे लागेल. तर त्यानंतर शाळा आणि महाविद्यालय स्तरावर शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

घरोघरी चौकशी, फोनवरही सूचना
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन चौकशी करीत आहेत. कचरा गाड्यांवरील लाऊडस्पीकरद्वारे तसेच आरोग्य विभागाच्या हेल्पलाइनमार्फतही संबंधितांचा शोध घेतला जात आहे. मात्र, तरीही लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी स्थिती आहे.

दृष्टिक्षेपात लसीकरण

  • १८ वर्षांवरील एकूण उद्दिष्ट २२ लाख
  • पहिला डोस घेतलेले १८ लाख ३६ हजार
  • दुसरा डोस घेतलेले ९ लाख ८७ हजार
  • लस न घेतलेले ३ लाख ६४ हजार
  • दुसरा डोस न घेतलेले २ लाख
  • १५ ते १८ वयोगटाचे विद्यार्थी दीड लाख

विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घेऊ
१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ आगामी ३ जानेवारी आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागेल. तर दुसऱ्या दिवसापासून शाळा-महाविद्यालयात शिबिरे घेणार आहोत.. डॉ. विनोद करंजेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, जि.प.

श्रद्धा, अंधश्रद्धेचा मुद्दा सुटला, तरीही अनुत्सुकता
लस घेतल्याने काहीशी विचित्र स्थिती निर्माण होते. तब्येत बिघडते. अनर्थ होतो. नवेच आजार निर्माण होतात अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबी पूर्वीच्या काळी कानावर यायच्या. परंतु ज्यांनी पहिला डोस घेतला, त्यांना काहीही झाले नाही, हे वास्तव आहे. मग आता त्यापैकीच दोन लाख लोक दुसरा डोज घेण्यासाठी पुढे का येत नाही, या मुद्दा आरोग्य विभागासाठी यक्ष प्रश्न बनला आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार नागरिकांनी अद्याप लसच घेतली नाही, हाही चिंतेचा विषय आहे.

बातम्या आणखी आहेत...