आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त करण्याची मागणी:जामलीत बिबट्याची दहशत; एकाच रात्री तीन बकऱ्यांसह कुत्र्याची शिकार

चिखलदरा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी, शेतमजूर व गुराख्यांमध्ये भीतीचे वातावरण

मेळघाटातील नैसर्गिक अधिवासात राहात असतानाही वन्य प्राणी कधी कधी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असाच प्रकार तालुक्यातील जामली येथे उघडकीस आला. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने एकाच रात्रीतून दोन बकऱ्यांसह एक बोकड व एका कुत्र्याची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील जामली येथे बिबट्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे संपूर्ण गावासह व आजूबाजूच्या गावांमध्ये दहशत पसरली आहे. जंगलातून बिबट्याने गावात प्रवेश केल्यावर गावातील गुरे चारणाऱ्या गणेश पटेल यांच्या गोठ्यातून दोन बकऱ्या व शेत मजुरी करणाऱ्या ब्रिजलाल दहीकर यांच्या गोठ्यातील एका बोकडाची बिबट्याने शिकार केली.

गणेश पटेल यांच्या गोठ्यात बिबट शिरल्यावर पाळीव प्राण्यांनी केलेल्या आक्रोशामुळे पाटील कुटुंबीय झोपेतून जागे झाल्याने बिबट्याने तेथील दोन बकऱ्या ठार करून पळ काढला. त्यानंतर ब्रिजलाल दहीकर यांच्या गोठ्यातील बोकड ठार करून ओढत नेत असताना रामकिशोर दहीकर यांच्या कुत्र्याने भुंकत बिबट्याचा पाठलाग सुरू केला.

मात्र बिबट्याने बोकड सोडून कुत्र्याला लक्ष्य करत ठार केले व कुत्र्याला घेऊन जंगलात पळ काढला. रात्री ग्रामस्थ जागे झाले. आर्थिक विवंचनेत असलेल्या नुकसानग्रस्त आदिवासींच्या दोन बकऱ्या आणि एका बोकडाच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे, तसेच बिबट्या नरभक्षक होण्याआधी व्याघ्र विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करत आहे.

आता गाव, जंगल ही झाले असुरक्षित : आदिवासी समुदाय आजही गुरे चारण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे गावात बिबट्या शिरल्याने दहशतीचे वातावरण असून, दररोज गुरे चारण्यासाठी जंगलात जाणाऱ्या गुराख्यांमध्येही कमालाची दहशत पसरली आहे. आम्ही गावातच सुरक्षित नाही, तर जंगलात गुरे, बकऱ्या चारायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळेल : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बकऱ्यांचे पंचनामे सकाळीच घटनास्थळी जाऊन केले असल्याचे वनरक्षक बिडघीर यांनी सांगितले. शासनाकडे प्रस्ताव पाठवून लवकरच वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पशुपालकांना शासन नियमानुसार मोबदला दिला जाईल. त्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया जामली वन वर्तुळाचे वनपाल राजेश धुमाळे यांनी दिली आहे.

वन कर्मचाऱ्यांची वाढवली गस्त, शेतकऱ्यांनी सावध रहावे
जामली परिसरात बिबट्याने एक बोकड, दोन बकऱ्यांची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामस्थांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. शिकार झालेल्या पाळीव जनावरांचे पंचनामे करण्यात आले. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावध रहावे. अभय चंदेल, वनपरिक्षेत्र अधिकारी, जामली.

बातम्या आणखी आहेत...