आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नागपुरात मोर्चा:पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आयुक्तालयावर धडक; अमरावतीतून मोठा सहभाग

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्चाला रवाना होण्यापूर्वी महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माँ जिजाऊच्या पुतळ्याला अभिवादन केले. दुसऱ्या छायाचित्रात मोर्चाला संबोधित करताना मागासवर्गीय महासंघाचे संस्थापक विजय चौरपगार. - Divya Marathi
मोर्चाला रवाना होण्यापूर्वी महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माँ जिजाऊच्या पुतळ्याला अभिवादन केले. दुसऱ्या छायाचित्रात मोर्चाला संबोधित करताना मागासवर्गीय महासंघाचे संस्थापक विजय चौरपगार.

पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत मिळवून घेण्यासाठी मागासवर्गीय कर्मचारी महासंघातर्फे आज, सोमवारी (ता. 3) नागपुरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात अमरावतीची भागीदारी लक्षणीय होती. येथून पाच हजारावर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

अमरावतीचे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोषागार कार्यालय, मुद्रांक विभाग, वनखाते आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी स्वखर्चाने या मोर्चासाठी रवाना झाले होते. अमरावती सोडण्यापूर्वी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जुन्या बायपासवरील माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विविध खासगी वाहने तसेच प्रासंगिक करारांतर्गतच्या एसटी बसने हे अधिकारी, कर्मचारी मोर्चाला रवाना झाले. मोर्चात दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्येष्ठ पदाधिकारी आचार्य कमलताई गवई यांच्यासह सामाजिक चळवळींमधील काही जागरुक नागरिकांनीही हजेरी लावली.

आजच्या आंदोलनासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव चौरपगार, विद्यापीठ कर्मचारी संघाचे नितीन कोळी, राजपत्रीत अधिकारी संघटनेचे रवींद्र जोगी, अनिल भटकर आदींच्या नेतृत्वात जिल्हाभरात ठिकठिकाणी सभा झाल्या होत्या. त्यामुळे ५ हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सकाळी 11 वाजता काढण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर पोचल्यानंतर मोर्चाचे एका सभेत रुपांतर झाले. दरम्यानच्या काळात तेथील विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय अधिकारी-कर्मचारी महासंघाने अलिकडेच जिल्हा कचेरीतील बचत भवनात विभागीय बैठकही घेतली होती. बैठकीत दिवसभर वेगवेगळे सत्र घेण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी आजच्या आंदोलनात सहभाग नोंदविला.

हा आहे नेमका मुद्दा

राखीव जागांवर नोकरी मिळविलेल्या राखीव जाती-जमातीमधील उमेदवारांना जात-जमातीच्या आधारे पदोन्नती दिली जात होती. राज्यघटनेच्या आधारे शासनाने हा निर्णय घेतला होता. परंतु नंतर शासनानेच तो रद्द केला. त्यामुळे पदोन्नतीचे आरक्षण गोठवल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तो हक्क पूर्ववत मिळवून घेण्याण्यासाठी मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी महासंघाने प्रदीर्घ लढा उभा केला आहे. आज पार पडलेला मोर्चा हा त्याचाच एक भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...