आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या सर्व 191 अर्ज कायमच:बाजार समिती निवडणुकीत माघारीचा क्रम सुरू, पहिल्या दिवशी कुणाचाही अर्ज नाही

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची रितसर प्रक्रिया आज, सोमवार, १० एप्रिलपासून सुरु झाली असली तरी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. आगामी २० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार असून नेहमीप्रमाणे शेवटच्या काही दिवसांतच माघारीसाठी गर्दी उसळेल, असा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे.

अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी आगामी २८ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यासाठी २१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १९१ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी बहुतेक उमेदवारांनी दोन किंवा त्याहून अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. २० एप्रिलपर्यंत यापैकी किती जण माघार घेतात आणि किती जण मैदानात टिकून राहतात, हे २१ एप्रिलला घोषित होणाऱ्या उमेदवारांच्या अंतिम यादीद्वारे स्पष्ट होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक अशाप्रकारे १८ संचालकांची निवड केली जाईल. विशेष असे की सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील प्रत्येकी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एससी-एसटी, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल या संवर्गासाठी प्रत्येकी एकेक जागा राखीव ठेवायची असून दोन जागांवर महिला उमेदवारांची निवड करणे बंधनकारक आहे. हमाल-मापारी मतदारसंघात ५५०, अडते-व्यापारी मतदारसंघात १०५६, तर सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघात प्रत्येकी दीड हजाराच्या आसपास मतदार आहेत. येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक सचिन पतंगे हे या निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

२८ ला मतदान, २९ ला मतमोजणी

राज्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार आगामी २० एप्रिलपर्यंत माघार घेण्यासाठी वेळ देण्यात आला असून २१ एप्रिलला मैदानात उरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली जाईल. त्याचदिवशी दुपारनंतर संबंधितांना निवडणूक चिन्हांचे वितरण केले जाणार असून २८ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी २९ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे.