आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणांकन:पायाभूत सोयी, आर्थिक कामकाजामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या ‘स्मार्ट’

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार समिती चौथ्या क्रमांकावर असून अमरावती कृउबाला अकरावा क्रमांक मिळाला आहे. पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर निकषांच्या आधारे क्रमवारी ठरवली आहे. हे निकष केवळ कागदावरच राहतील की प्रत्यक्षात त्याचा फायदा शेतकरी व व्यापाऱ्यांना मिळेल याचे उत्तर येणारा काळच देईल.

पणन संचालनलयाने जाहीर केलेल्या यादीत चांदूर बाजार येथील बाजार समितीला राज्यात चौथा, अमरावतीला अकरावा क्रमांक मिळाला आहे. राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी चांदूर बाजारच्या बाजार समितीला २०० पैकी १५७ गुण मिळाले असून तीन बाजार समित्यांसह चांदूर बाजार संयुक्तरुपात चौथ्या स्थानी असून जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकावर आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला १४७ गुण मिळाले असून अकरावा क्रमांक प्राप्त झाला आहे.

बाजार समित्यांची कामगिरीच्या आधारावर क्रमवारी प्रसिद्ध करणे हा महत्त्वाचा उपक्रम आहे. बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

अमरावती बाजार समितीचा क्रमांक २३ गुण घटल्याने खालावला अमरावती बाजार समितीला १४७ गुण मिळाले आहेत, तर राज्यात पहिली असलेल्या लासलगाव बाजार समितीला १६३ गुण मिळाले आहेत. अमरावती बाजार समितीकडून दोष दुरुस्ती अहवाल निबंधक कार्यालयाकडे ९० दिवसांच्या आत गेला नाही, त्यामुळे १० गुण कमी झाले. तसेच प्रत्येक आडत्यांकडून शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वजनाची पावती मिळायला पाहिजे. अमरावती बाजारात काही तांत्रिक कारणामुळे ती पावती शेतकऱ्यांना अजूनही हस्तलिखीत स्वरुपात दिली जाते. वास्तविकता इलेक्ट्रिक वजन काटेे आहेत. त्यामुळे १० गुण घटले आणि केवळ एका आडत्याकडे इलेक्ट्रिक वजन काटा नाही. त्यामुळे ३ गुण असे एकूण २३ गुण घटले आहेत. अन्यथा अमरावती बाजार समितीला एकूण १७० गुण मिळून राज्यात अव्वल क्रमांक मिळाला असता.

आगामी वर्षी अव्वल येण्याचा प्रयत्न
अमरावती बाजार समितीचा वार्षिक व्यवहार सुमारे २००० कोटी रुपयांचा आहे. बाजार समितीला मागील वर्षी १८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. मागील वर्षभरात मालाची आवक ४१ लाख क्विंटलची होती. तसेच यंदा झालेल्या क्रमवारी दरम्यान बाजार समितीला २३ गुणांचे नुकसान झाले आहे. यंदा राहिलेल्या उणिवा पूर्ण करून आगामी वर्षात राज्यात प्रथम येण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
- भालचंद्र पारीसे, प्रशासक तथा सहायक उपनिबंधक. कृउबास, अमरावती.

या चार मुख्य निकषांद्वारे समित्यांचे झाले गुणांकन
पायाभूत व इतर सेवा सुविधा, आर्थिक कामकाज निकष, वैधानिक कामकाज आणि इतर निकष या चार मुख्य निकषांसह एकूण ३५ निकषांच्या आधारे २०० गुणांपैकी गुणांकन करण्यात आले. चांदूर बाजार व अमरावती बाजार समितीला अनुक्रमे पायाभूत व इतर सेवा सुविधा - ५४ व ५७.५०, आर्थिक कामकाज - ३५ व २२.५०, वैधानिक कामकाज -४६ व ४२ आणि इतर निकष २२ व २५ एकूण १५७ व १४७ गुण मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...