आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह ​​​​​​​:अमरावती-नागपूर मेट्रोच्या मार्गात रेल्वे मंत्रालयाचा मेगा ब्लॉक

वैभव चिंचाळकर | अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-नागपूर ब्राॅडगेज मेट्रोसाठी महामेट्रो ब्राॅडगेज प्रोजेक्टद्वारे चार महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्रालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवल्यानंतरही अद्याप मंजुरी दिली नसल्यामुळे हा प्रकल्प सध्या रखडला आहे.सध्या रखडला आहे.

आधी प्रति किलोमीटर ४० ते ५० पैसे लाभ मिळावा, असे रेल्वेला वाटत होते. परंतु, आता सव्वा ते दीड रुपया प्रति किलोमीटर मिळावे, असे वाटत आहे. या वाढीव दराबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याने ब्राॅडगेज मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात ‘मेगा ब्लॉक’ निर्माण झाला आहे. रेल्वे, महामेट्रो, रेल्वे मंत्रालयासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच राहिला आहे.

कोरोना लाटेच्या आधी सुमारे २ वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच अमरावती-नागपूर आरामदायक मेट्रो सुरू होणार, अशी घोषणा केली होती. सोबतच यात खासगी कंपन्यांची भागीदारी असेल, असेही सांगितले होते.

परंतु, कोणताही खासगी भागीदार पुढे आला नसल्याने शेवटी खासगी भागीदारीचा विषय थांबला. या उपक्रमाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांची तत्कालीन रेल्वेमंत्री गोयल यांच्याशीही चर्चा झाली होती. परंतु, नंतर रेल्वेमंत्री बदलले. त्यामुळे हा अमरावती-नागपूर मेट्रो उपक्रम थंड बस्त्यात आहे. नागपुरात एक्स्प्रेसचे आरक्षण करून जाण्यासाठी किमान १७५ रुपये लागतात. तसेच वेळही साडेतीन तासांचा लागतो.

मेट्रोला राहतील ‘वंदे भारत’चे ६ ते १२ कोच
रेल्वेने हिरवी झेंडी दिल्यानंतर ब्राॅडगेज मेट्रोला वंदे भारत गाडीचे कोच राहतील. यात केवळ बसण्याची सोय असेल. तसेच तीन, सहा, बारा अशा संख्येत कोच राहतील. मेट्रोकडे तिकिटांची व तिकीट तपासणीची जबाबदारी राहील. तसेच खाद्यपदार्थ, पाणी, शीतपेयही माफक दरात मिळतील, अशी माहिती मेट्रो कार्यालयाद्वारे देण्यात आली.

मेट्रो सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार
अमरावती-नागपूर ब्राॅडगेज मेट्रो सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. कारण ही मेट्रो ९० किमी.प्रतितास वेगाने धावणार असून नागपुरात २ तासात पोहोचवणार आहे. मेट्रोचे पूर्णच कोच हे एसी राहणार आहेत. त्यामुळे नागपूरसाठी तिकीट दर सुमारे २०० रुपये राहण्याचा अंदाज मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर पॅसेंजर गाड्या बंद होतील. तसेच ही मेट्रो मार्गातील काही मोजकेच थांबे घेईल. त्यामुळे वेळ वाचेल, अशी माहिती महामेट्रोद्वारे देण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाकडून काहीच हालचाल नाही
पॅसेंजरच्या ऐवजी मेट्रो चालवली जाणार आहे. यासंदर्भातील महामेट्रोकडून आमच्याकडे आलेला प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे चार महिन्यांपूर्वीच पाठवला आहे. मात्र, याबाबत कोणतीही हालचाल सुरू नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, भुसावळ.

सुविधा उपलब्ध, केवळ परवानगी आवश्यक
ही ब्राॅडगेज मेट्रो असून यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून अजूनही हिरवी झेंडी मिळाली नाही. आम्हीही प्रतीक्षेत आहोत. कारण अमरावती-नागपूर मेट्रोसाठी रेल्वे स्थानक, रेल्वे रूळ, वीज अशा सुविधा उपलब्ध आहेत. केवळ मेट्रो चालवण्यास परवानगी मिळावी. - सुनील तिवारी, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

बातम्या आणखी आहेत...