आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांची पसंती!

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच येथील ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस पर्यटकांच्या पसंतीला उतरले आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांना एक पर्वणी ठरत आहे.

चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, धारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. एका जिप्सीमध्ये सहा पर्यटक जंगल सफारीला जातात. चिखलदरा, नरनाळा, धारगड, बोरी येथील जवळपास ७० जिप्सी चालक असून जंगल सफारी व पर्यटन स्थळावरील विविध पॉइंट साठी त्यांना आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. जंगल सफरीदरम्यान पर्यटकांना आता हमखास वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, सांबर, हरिण, मोर तसेच विविध पक्षी-प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे.

२९४ विविध प्रजातींच्या पक्षीवैभवाने मेळघाट समृद्ध
निसर्ग साखळीतील पक्षीसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. मेळघाट २९४ विविध पक्षाच्या प्रजातीच्या पक्षी वैभवानी संपन्न आहेत. तसेच याशिवाय युरोप, आशिया खंडातील १५० पेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी आढळून येतात. मेळघाटात शेकडो प्रजातींचे रंगबिरंगी पक्षी मधुर स्वरांनी जंगलातील नीरव शांततेत माधुर्य आणतात, कान मंत्रमुग्ध करतात. पक्षिप्रेमींसाठी हा काळ एक पर्वणी ठरत आहे

ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला पसंती
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मोठ्या प्रमाणात ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. जंगलातील कोलकास, रंगुबेली, हतरु, चौराकुंडसह सेमाडोह येथील पर्यटन संकुल पर्यटकांना आरक्षणावर दिले जात आहे. तर यातील काहींचे दुरुस्तीचे काम सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...