आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू चला यारहो’ सारखी स्फूर्तीदायक रचना... ‘चुपके चुपके रात दिन’ सारखी रसिक प्रिय गजल... ‘सलोना सा सजन है’सारखी लाघवी गजल आणि ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’सारखे भावविभोर करणारे काव्य, असा सुरेल स्वर सोहळा नुकताच श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रंगला. निमित्य होते, संगीतकार आणि गजल गायक सुरेश दंडे प्रस्तुत सूरमयी शाम या जोशील्या मैफलीचे. सुरेश भट यांच्या गीतांमधून त्यांच्या स्मृती जागविणे, हाही या मैफलीचा एक उद्देश होता. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊन यांच्या सहभागाने पार पडलेल्या या संगीत सोहळ्याला पुण्याचे पंडित रमाकांत गायकवाड आणि हैद्राबादच्या अवघ्या १७ वर्षांच्या ज्योती शर्मा हिच्या विलोभनीय गायकीने चार चांद लावले. सुरेश दंडे यांच्यासोबत शीतल भट या अमरावती शहरातल्या गायिकेनेही रसिकांची दमदार दाद घेतली.
‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ या सर्वधर्म समभावाचा अर्थ सांगणाऱ्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गजलांचा हा सिलसिला मग ‘दिल में एक लहर सी उठी है अभी’, ‘तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही’, ‘आज जाने की जिद ना करो’, ‘रस्मे उल्फत को निभाये’,’ मै झुकावू सर कही भी’, ‘नाही म्हणावयाला आता असे करूया’, ‘ये मुलाकात एक बहाना है’, ‘इस मोडसे जाते है’ आणि ‘इतकेच मला जाताना’ अशा गीत-गजलांनी सजला. ‘दमादम मस्त कलंदर’ या जोरकस गीताने मैफिलीचा समारोप झाला. या संगीतमय कार्यक्रमाचे निवेदन नितीन भट यांनी केले.
यांनी केली साथसंगत : या संगीतमय कार्यक्रमाप्रसंगी सिंथेसायझरवर रामेश्वर काळे, तबल्यावर शीतल मांडवगडे, ऑक्टोपॅडवर वीरेंद्र गावंडे, तर व्हायोलिनवर हरीश लांडगे यांनी सुरेल साथ केली. रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनच्या वतीने कलाकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह देवून अध्यक्ष डॉ. आनंद दशपुते आणि प्रकल्प प्रमुख सुनील चिमोटे यांच्या हस्ते सन्मानित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.