आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद चिमोटे काॅंग्रेसचे दुसरे प्रवक्ते:दिलीप एडतकर यांच्यापाठोपाठ अमरावती कॉंग्रेसला दुसरा बहुमान, पटोलेंनी केली घोषणा

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‌ॅड. दिलीप एडतकर यांच्यापाठोपाठ काँग्रेसने अमरावतीत आणखी एका प्रदेश प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. माजी महापौर मिलिंद चिमोटे दुसरे प्रवक्ते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच त्यांच्या नावाची घोषणा केली.

मिलिंद चिमोटे हे विद्यार्थी असताना पासून कॉंग्रेसचे पदाधिकारी आहेत. एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना शहराचे प्रथम नागरिक, अर्थात महापौर हे पदसुद्धा भूषविता आले. गेल्या काही दिवसांत डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत त्यांनी भाजपमध्ये काम केले. तो अल्पावधी वगळता ते कायम काँग्रेसमध्ये आहेत.

काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विधानपरिषदेची निवडणूकही लढवली हाेती. दरम्यान एडतकर व चिमोटे असे दोन प्रवक्ते अमरावतीत असल्यामुळे काँग्रेसची पकड आणखी मजबूत होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना-भाजपच्या युतीकाळात कृषिमंत्री राहिलेल्या डॉ अनिल बोंडे यांना भाजपने अलीकडेच राज्यसभेवर निवडले आहे. त्याचवेळी येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही मूळ अमरावतीकर असलेल्या भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कधीकाळी अमरावती जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता होती. महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच वरचढ होती. परंतु गेल्या काही दिवसांत महापालिकेसह जिल्ह्यातील काही नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये विरोधकांना सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रवक्तेपदी नियुक्ती आणि संघटनात्मक बांधणी वाढवून काँग्रेस पूर्वपदावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...