आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री महोदय 265 दिवस हाताला रोजगार नाही:'मग्रारोहयो'चा रोजगार कागदोपत्रीच!- सत्तारांसमोरच शेतकऱ्याने काढले वाभाडे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''मंत्री महोदय वर्षभरातील पावसाळ्यातील दिवस सोडता उर्वरित 265 दिवस हाताला पुरेसा रोजगार नाही, 'मग्रारोहयो'चा रोजगार नुसता कागदोपत्रीच दाखविण्यात येतो अशी पोलखोल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर आज एका शेतकऱ्याने करीत यंत्रणेचे वाभाडेही काढले.

आदिवासी शेतकऱ्यांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा अगदी बारकाईने अभ्यास करून घेण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्री एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला थांबले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच त्यांनी संवादाची अनेक सत्रं झाली. त्यावेळी आज शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

शेतकऱ्यांसोबतची चर्चा मोलाची

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शिवाय आदिवासींचे घर ते त्यांची शेती असा प्रवासही केला. या दरम्यान ''शेतकऱ्यांशी झालेली चर्चा ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची असून त्याचा वापर प्रभावी कृषी धोरणासाठी केला जाईल.''

मंत्र्यांनी विचारली शेतकऱ्यांना प्रश्न

मंत्री सत्तार यांचा पहिला प्रश्न होता..तुम्ही शेतात नेमकी, कोणकोणती पीके घेता ? यावर ग्रामस्थ म्हणाले पारंपरिक तांदूळ ( भात ), ज्वारी, उडीद, मक्का आणि तेलबियाणे असलेले सोयाबीन. त्यावर मंत्र्यांनी पुढे अनेक प्रश्न केले.

सत्तारांकडून प्रश्नांची सरबत्ती

मंत्री सत्तारांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारले की, प्रती हेक्टर किती खर्च लागते ? त्यातून सरासरी उत्पन्न किती मिळते ? कृषी खात्याकडून तुम्हाला या भागात शासकीय योजनेचा लाभ मिळतो का ? वेळेवर पीक कर्ज अथवा नुकसान भरपाई मिळते का ? प्रती व्यक्तीमागे किती मजुरी मिळते ? मग त्यातून तुमच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह नेमका कसा चालतो ? सावकारी कर्ज घेता का ? शेती गहाण ठेवता का ? तलाठी, ग्रामसेवक गावात येतात का ? गावात किती दिवस दिसतात. अशा नानाविध प्रश्नांबाबत त्यांनी अगदी रोखठोक चर्चा घडवून आणली.

तुम्हाला आमच्याकडून कोणत्या अपेक्षा

यावेळी शेतकऱ्यांच्या एका समुहाला उद्देशून त्यांनी विचारले, की तुम्हाला आमच्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत ? पीक नुकसानीसंदर्भात तलाठ्यामार्फत पंचनामे करण्यात आले का ? वन व महसूल खात्याचे अधिकारी, तलाठ्यांनी यापूर्वी गावात कधीतरी भेटी दिल्या आहेत का ? यावर शेतकऱ्यांकडून मंत्री महोदयापुढे वेगवेगळी उत्तरे देत तक्रारी मांडल्या. हे सर्व ऐकल्यानंतर मी आणि माझे शासन यापुढे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू. त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहो, असे म्हणत मंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला.

याप्रसंगी मंत्री महोदयांसोबत त्यांचे खाजगी सचिव नरेंद्र कुलकर्णी, विशेष कार्यासन अधिकारी प्रशांत ठाकरे, रत्नाकर पगार यांच्या व्यतिरिक्त कृषी सहसंचालक किसन मुळे, विभागीय कृषी अधीक्षक अनिल खर्चान आदि उपस्थित होते.

मंत्री सत्तारांपुढे साद्रावाडी येथील शेतकरी, ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या त्या अशा..

  • आमची शेतजमीन ही पठारी असून जंगल परिसरात मोडते.
  • बऱ्याच जणांची शेती ही वर्ग दोन असल्यामुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.
  • अनेकांकडे कोरडवाहू जमीनी असून निसर्ग आधारित पीके घेण्यात येतात.
  • जमीन मशागतीपासूपन पीक घरी येईपर्यंत शेतमजुरीचा रोजगार हा फक्त 100 दिवसांचाच असतो.
  • वर्षभरातील उर्वरित 265 दिवस हाताला पुरेसा रोजगार नाही, मग्रारोहयोचा रोजगार नुसता कागदोपत्रीच दाखविण्यात येतो.
बातम्या आणखी आहेत...