आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांपूर्वीचा वाद:मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा; वनवेतून जाण्यास राेखणाऱ्या पोलिसाशी घातली होती हुज्जत

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाच्या प्रक्रियेचा आदर, उच्च न्यायालयात दाद मागणार - अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी व त्यांच्यासोबतच्या तिघांनी ८ वर्षांपूर्वी शहरात एका वाहतूक पोलिसासोबत वाद घातला होता. या प्रकरणात येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फालके यांच्या न्यायालयाने गुरुवारी मंत्री अॅड. ठाकूर यांच्यासह अन्य तिघांना प्रत्येकी ३ महिन्यांचा कारावास व १५,५०० दंडाची शिक्षा सुनावली.

२४ मार्च २०१२ ला आमदार यशोमती ठाकूर, वाहनचालक व अन्य दोघे असे एका कारने राजापेठकडून गांधी चौकाकडे जात होते. चुनाभट्टी चौकात वाहतूक पोलिस उल्हास बाळकृष्ण रौराळे यांनी अॅड. ठाकूर यांचे वाहन थांबवले आणि वनवे असल्यामुळे पुढे नेता येणार नाही, असे सांगितले. त्या वेळी आ. ठाकूर यांनी रौराळे यांच्याशी वाद घातला. त्यांच्यासोबतच्या सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांनीही वाद घालून मारहाण केली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अॅड. ठाकूर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, शासकीय कामात अडथळा अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

कोर्टाच्या प्रक्रियेचा आदर, उच्च न्यायालयात दाद मागणार

न्यायालयीन प्रक्रियेचा सदैव आदर करते. मी स्वत: वकील आहे. फार भाष्य योग्य नाही. आम्ही हायकोर्टात दाद मागू. आता राजीनाम्यासाठी एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकेच काम आहे. - अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री.

बातम्या आणखी आहेत...