आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतोष बांगरांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला:अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीतील घटना; बांगर म्हणाले- मर्द असाल तर समोर या

अमरावती8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटामध्येमध्ये गेलेले आमदार संतोष बांगर हे रविवारी (दि. 25) येथील देवनाथ मठातून दर्शन करून निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली. यावर 'दिव्य मराठी'ने आमदार संतोष बांगरांशी संपर्क साधला असताना आमदार बांगर म्हणाले की, भ्याड हल्ले काय करता; मर्द असाल तर समोर यावे मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक काय असतो हे दाखवतो असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे. .

आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून शिंदे गटात सामिल झाले. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. रविवारी दुपारी तीन वाजता ते येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली.

त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनांचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली. या वेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. या घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

एक घाव दोन तुकडे केले असते पण....

मर्द असताल तर छातीवर वार करून दाखवा, 10 ते 12 जणांकडून माझ्यावर हा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मी देवदर्शनासाठी तिथे सहकुटुंब गेलो होतो. कुटुंबियांनी रोखल्यामुळे मला गाडीतून खाली उतरता आले नाही. अन्यथा त्यांना बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक काय हे दाखवून दिले असते. एक घाव आणि दोन तुकडे केले असते. हल्लेखोरांना आव्हान देतो मी पुन्हा एकटा तिथे येतो मग माझयावर हल्ला करून दाखवा मग खरा शिवसैनिक काय असतो ते दाखवून देईल असा इशाराही त्यांनी हल्लेखोरांना दिला आहे.