आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध गायक पद्मश्री मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद 6 ऑगस्ट रोजी अमरावतीत येत आहे. राज्यातील कलावंतांच्या मदतीसाठी आयोजित एका संगीत मैफलीत ते किशोर कुमार व मोहम्मद रफी यांची 10 गाणी गाणार आहेत. नागपुरच्या ‘हार्मोनी इव्हेंटस्’चे संचालक तथा सदर मैफलीचे आयोजक राजेश समर्थ यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.
युकेसह भारतात एकाच वेळी 91 ठिकाणी संगीत मैफल आयोजित करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचलेल्या हार्मोनी इव्हेंटस् चा अमरावतीतील हा पहिलाच कार्यक्रम आहे. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी 7 वाजता ही मैफल सुरु होईल. ‘अंदाज-ए-रफी-किशोर’ नावाच्या या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता शेलगावकर करणार असून संचालनादरम्यान त्या शाहीद रफी यांच्याशी बातचित करत रफी साहेबांचा संपूर्ण जीवनपट श्रोत्यांसमोर मांडणार आहे. ड्युएट सॉंगमध्ये स्वाती खडसे, प्रिया गुप्ता व गगन पुरी हे कलावंत त्यांना मदत करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
वाद्यवृंदांना मदतीचा हात
कोरोना काळात गेली दोन वर्षे कलावंतांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. गायन किंवा वाद्यवृंद हेच ज्यांच्या उपजिवीकेचे साधन आहे. त्यांचे या काळात हाल झाले. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यासाठी श्रोत्यांकडून नाममात्र देणगी शुल्क घेतले जाणार आहे. ही देणगी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी कार्यक्रम स्थळी स्वीकारली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
देशभरात 350 कार्यक्रम
दरम्यान अशाप्रकारे आतापर्यंत देशभरात साडे तीनशे कार्यक्रम करण्यात आले असून त्यातून गोळा झालेले ३५ लाख रुपये कलावंतांना देण्यात आले, अशी माहितीही राजेश समर्थ यांनी यावेळी पुरविली. पत्रकार परिषदेला समर्थ यांच्याशिवाय स्वाती खडसे, जितेंद्र राजकुमार, चंद्रकांत पोपट, दिनकर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक कलावंतांनाही संधी
शाहीद रफी यांच्याशिवाय दिनकर पांडे, जितेंद्र राजकुमार, संतोष शर्मा, डॉ. वामन जवंजाळ, मुरली खिलरानी, चंद्रकांत पोपट, दीपक सुतावने, प्रफुल्ल इंगळे, अमोल वाकोडे, दीपक उलेमाले, सुभाष वाघमारे, सरिता हनवंते, सविता पडोळे हे स्थानिक कलावंतही या मैफलीत आपली गायन कला सादर करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.