आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा मान्सून लवकर येणार असा हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज यंदा सपशेल फोल ठरला आहे. कारण १५ जून पर्यंतही जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस आला नाही. दरम्यान, गुरुवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास मान्सूनच्या वाऱ्याने सर्वदूर जिल्हा व्यापला आहे. मात्र, मान्सूनच्या दमदार पावसासाठी आणखी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा स्थानिक हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मान्सूनच्या पावसाला उशिर झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील पेरण्या लांबल्या आहेत. त्याचा फटका उडीद, मुगाला बसणार आहे.
यावर्षी अर्धा जून महिना संपला तरीही पेरणीला सुरूवात झाली नाही. मान्सून आलाच नाही. मात्र, दरवर्षी मोसमी पाऊस येतो, यंदा त्यानेसुद्धा जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांच्या तुलनेत जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सर्वात कमी पाऊस यंदा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७७ मिमी पाऊस अपेक्षित होता मात्र, केवळ २० मिमी पावसाची नोंद झाली अहे. मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये १५ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२० मिमी, २०२० मध्ये ९०.३ मिमी पावसाची सरासरी नोंद झाली होती. त्यामुळे सर्वच भागात पेरणीला सुरूवात झाली होती.
मान्सूनचा समाधानकारक पाऊस १९ जूननंतरच जिल्ह्यात येईल. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जमिनीत सुमारे दीड ते दोन फूट ओल तयार झाल्यानंतर पेरणीसाठी पोषक स्थिती तयार होईल. मात्र, यंदाही पेरणीसाठी सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला किमान २५ जून उजाडणार, असे दिसत आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर वगळता उडीद, मूग व कपाशीच्या पेरणीला उशिर होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उडीद, मुगाच्या उत्पादनावर फरक पडेल
उडीद,मूग हे ६५ ते ७० दिवसांचे पीक आहे. आतापर्यंत उडीद व मुगाची पेरणी होणे आवश्यक होेते मात्र. अद्याप पाऊस नसल्यामुळे पेरणीला सुरूवात झाली नाही. परिणामी उडीद व मुगाच्या उत्पादनात घट येईल. या दोन पिकाव्यतिरिक्त इतर पिकांची ३० जूनपर्यंत पेरणी केल्यास अडचण नाही.
-प्रकाश साबळे, शेतकरी व कृषी अभ्यासक.
कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही
मान्सूनच्या वाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा व्यापला. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात तयार झालेले नाही. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस (१९ जूनपर्यंत) जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता नाहीच.
-डॉ. सचिन मुंडे, कृषी हवामान तज्ज्ञ, केव्हीके. दुर्गापूर तथा जिल्हा कृषी हवामान केंद्र, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.