आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन विशेष:900 हून अधिक वनस्पती, 35 प्रकारचे प्राणी, 295 प्रजातींचे पक्षी घालताहेत मेळघाटच्या वैभवात भर

अमरावती । रवींद्र लाखोडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवघा विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या मेळघाटचे खरे वैभव त्यात असलेल्या जैव विविधतेत आहे. 900 हून अधिक वनस्पती, 35 प्रकारचे सस्तन प्राणी 295 प्रजातींचे पक्षी आणि ना-ना विविधतेने नटलेला हा परिसर आहे. रविवारी (ता. 5) जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्त या संपदेची आठवण क्रमप्राप्त झाली आहे.

गवताळ माळरानाचे पट्टे

मेळघाट हे अमरावती जिल्ह्यातील वनक्षेत्र असले तरी राज्यातील इतर वनक्षेत्रांच्या तुलनेत ते मोठे आहे. जिल्ह्यात वेगवेगळे अधिवास असलेली जंगले असून 131 प्रजातींची फुलपाखरे, 200 पेक्षा जास्त कोळी प्रजाती, 36 प्रकारचे साप तसेच 11 जातींच्या बेडूक प्रजातीही आहे. ​​​

सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटचे राकट जंगल, त्याच पर्वत रांगेत सालबर्डी व महेंद्रीचे जंगल शिवाय अमरावती शहराजवळ असलेले वडाळी-पोहरा-मालखेडचे जंगल आहे. काही ठिकाणी झुडपी काटेरी जंगल तर अमरावती ते तिवसा व मोर्शी या ठिकाणांच्या मध्यात गवताळ माळरानांचे पट्टे आहे.

जैवविविधता आजही टिकुन

मेळघाटचे जंगल हे संरक्षित असल्यामुळे आणि गेल्या ४९ वर्षापासून खास वाघांसाठी व्याघ्रप्रकल्प योजनेत विशेष संरक्षण मिळाल्यामुळे तेथील जैवविविधता टिकून राहण्यास मोलाची मदत झाली आहे. हे जंगल टिकून राहिल्यामुळे या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या आजही जिल्ह्यातील मुख्य जलसिंचन प्रकल्पासाठी महत्वाची उपलब्धी ठरल्या आहेत. मेळघाटमधून उगम पावणाऱ्या सिपना, खापरा, खंडू, डोलार, व गदग ह्या नद्या तापी नदीला मिळतात तर वन शहानूर, सापण, बिच्छन ह्या नद्यांवर बांधलेल्या सिंचन प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यास पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

रविवारी निसर्गभ्रमंतीचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या, रविवारी सकाळी ७ वाजता बांबू गार्डन ते वडाळी तलाव असा निसर्ग भ्रमणाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. वनाधिकारी नितीन गोंडाने आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे (वेक्स) संस्थापक डॉ. जयंत वडतकर यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आखला आहे. या भ्रमणादरम्यान तेथील जैवविविधता जाणून घेण्यात येईल. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

113 वर्षानंतर आढळला रानपिंगळा

मेळघाटचे वनक्षेत्र हे दुर्मिळ प्रजातींसाठीसुद्धा महत्वाचा अधिवास आहे. याठिकाणी भारतातून नामशेष झालेला आणि 113 वर्षानंतर पुनर्शोध लागलेला रानपिंगळा ही दुर्मिळ घुबड प्रजाती चांगल्या संखेत आढळून येते. या पक्ष्यासाठी जगभरातून पक्षी अभ्यासक आणि पर्यटक मेळघाटला भेट देत असतात. रानपिंगळा दिसून आल्याने मेळघाटच्या वन्यजीव संपदेत मोलाची भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...