आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची हजेरी:आई अंबादेवी, एकवीरा देवीने केले सीमोल्लंघन; परतताना पावसाची हजेरी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचीन परंपरेनुसार आई श्री अंबादेवी, आई श्री एकवीरा देवे यांनी विजयादशमीच्या पर्वावर बुधवार ५ रोजी सायंकाळी सीमोल्लंघन केले. यासह नवरात्रोत्सवाचाही समारोप झाला. दुपारी ३ वाजताच दोन्ही देवींच्या पालखी या मंदिरातून मोठ्या उत्साहात बाहेर पडल्या. मात्र, बियाणी महाविद्यालयाजवळून परत येताना मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली. ज्याला जेथे जागा मिळेल तेथे त्याने आश्रय घेतला.

एकवीरा देवी मंदिरातून देवीची उत्सवमूर्ती अंबादेवी मंदिरात पोहोचली. त्यानंतर आई अंबादेवीच्या पालखीत उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर दोन्ही देवींच्या पालखी सीमोल्लंघनाला वाजत, गाजत निघाल्या. तत्पूर्वी अंबादेवी संस्थानाचे सचिव रवींद्र कर्वे व एकवीरा देवी संस्थानाचे सचिव शेखर कुळकर्णी यांनी देवींचे पूजन केले. त्यानंतर अंबादेवी मंदिर ते रवीनगर पर्यंत रस्त्यावर पसरलेल्या हिरव्या गालिच्यावरून देवींचे मार्गक्रमण सुरू झाले. पुढे फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे, बँजो वाजत होता. भजनी मंडळं भजनं गात होते.

भालदार, चोपदार तसेच पालखी घेऊन भोऊ मार्गक्रमण करीत होते. रस्त्याच्या दुतर्फा भाविक देवींवर फुलांचा व सोन्याचा (आपट्याची पाने) वर्षाव करीत आशीर्वाद घेत होते. मार्गात भाविकांना प्रसाद, पाणी, नाश्ता वाटला जात होता. दरम्यान किन्नरांनीही नृत्य करून देवीची आराधना केली. यावेळी शेकडोच्या संख्येत भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. बियाणी महाविद्यालय परिसरात पुजाऱ्यांनी दोन्ही पालखींची पूजा केल्यानंतर पालखी परत मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागल्या. त्यावेळी रस्त्यावर उभारलेल्या कमानींमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी संस्थानाद्वारे भाविकांना सुक्या मेव्याचा प्रसाद वाटण्यात आला. भाविकांनी उत्साहात दर्शन घेतले परंतु, पावसामुळे काही भाविकांना पालखीचे दर्शन करता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...