आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही बनवाबनवी!:बनावट दस्ताऐवजाद्वारे दुसऱ्यांची जनावरे दाखवून दिला गोठ्याचा लाभ, रासेगावात MRGS निधीचा अपव्यय

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (एमआरजीएस) अंतर्गत तालुक्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना गुरांच्या गोठ्याचा लाभ देण्यात येतो. एमआरजीएसच्या कामात मोठा घोळ केला जात असून निधीचा अपव्यय केल्या जात असल्याचा प्रकार रासेगाव येथे झाल्याची तक्रार उपसरपंच प्रवीण बांडेबुचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. रासेगाव येथील एका व्यक्तीकडे जनावरे नसतानाही त्याने गैर मार्गाने मग्रारोहयो योजने अंतर्गत गुराच्या गोठ्यांच्या योजनेचा लाभ घेतला असून त्या बाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रासेगाव येथील एका व्यक्तीला २०२०-२१ दरम्यान एमआरजीएस अंतर्गत गुरांचा गोठा मंजुर करण्यात आला. २ ते ६ गुरांसाठी पक्क्या गोठ्याकरिता ७७ हजार १८८ रुपये अनुदान दिल्या जाते. त्याकरिता लाभार्थी अल्पभूधारक, जॉबकार्ड व जनावरे असण्याचे प्रमाणपत्र अशा दस्तावेजांसह प्रस्ताव पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकाकडे दाखल करावा लागतो. गोठ्याच्या बांधकामाचे निरीक्षण करण्याची जबाबदारी ही तांत्रिक सहाय्यकाची असते, तर जनावरे असल्याचा दाखला पशु संवर्धन अधिकाऱ्यांना द्यावा लागतो.

बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांची असते. अशा जबाबदाऱ्या निश्चित असताना या लाभार्थ्या लाभ देताना बोर्डी येथील पशुसंवर्धन पर्यवेक्षकाने लाभार्थ्याच्या नावाने ४ गाई, २ म्हशी असल्याचे बिल्ले लावून दिले. या बाबात त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले. बोर्डी येथील पशुसंवर्धन पर्यवेक्षकाने याच जनावरांचे अन्य एका पशुपालकाच्या नावे लसीकरण केले असल्याचे ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रात दिसून येते. त्यामुळे नेमकी ही जनावरे कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घाेळाबाबत चौकशी व्हावी

रासेगाव येथील संबंधित लाभार्थ्याला जनावरांच्या गोठ्याचा लाभ देण्यामध्ये काही शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. गोठा पूर्ण न करता १२ हजार ५०० रुपयांचे पहिले मस्टर शोधन करण्यात आले. इतर देयके सादर करण्यात आली असून त्याची सखोल चौकशी व्हावी. - प्रवीण बांडेबुचे, तक्रारकर्ता, रासेगाव

तक्रार प्राप्त, चौकशी करणार

रासेगाव येथील एका पशुपालकाला जनावरांचा गोठ्याचा लाभ घेण्याकरिता पशुसंवर्धन विभागाकडून केवळ जनावरे असल्याचा दाखला देण्यात आला. त्यांनी जनावरे दाखवित प्रतिज्ञापत्रावर मालकीची जनावरे असल्याचे नमुद केले. याबाबत बांडेबुचे यांची तक्रार प्राप्त झाली असून योग्य चौकशी करू. - पी. एन. ठाकुर, तालुका पशु संवर्धन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...