आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविला जाणार असून अमरावती शहरात ५० हजार तिरंगे फडकविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मनपाच्या कॉन्फरन्स हाॅलमध्ये मंगळवार २ रोजी दु.२.३० वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.
देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिमान, स्वाभिमान, देशभक्ती दर्शविण्यासाठी हर घर तिरंगा मोहिम मनपा क्षेत्रात १०० टक्के राबवणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील ऐतिहासिक स्थळे जसे जवाहर गेट, हुतात्मा स्मारक, जयस्तंभ त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी मनपाद्वारे तीन दिवस विद्युत रोशनाई केली जाणार आहे. नागरिकांनीही अमृत महोत्सव सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काठीसह सर्वसामान्यांना २१ रुपयांत तिरंगा ध्वज मिळेल. मात्र, कारीशिवाय जर घेतला तर किंमत कमी होईल. शहरात ३५६ शाळा, महाविद्यालये आहेत. त्यांच्याशीही संपर्क साधला जाणार असून तिरंगा ध्वजाची आचार संहिता पाळली जाते की नाही याचे निरिक्षण ड्रोनद्वारे केले जाणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी ध्वज खरेदी करण्यासाठी ३.५ लाखाचे योगदान दिल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
एका इमारतीवर एक ध्वज
शहरात ९७ हजार घरे, इमारती आहेत. यापैकी बहुतेक घर व इमारतींवर तिरंगा फडकावा यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. एक घर किंवा इमारतीवर एक तिरंगा ध्वज राहील, असे नियोजन आहे. मनपाच्या पाचही झोनमध्ये १० विक्री केंद्रे राहणार असून, शासनाकडून ५० हजार ध्वज मिळणार आहेत. यासाठी ५ प्रमुख विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सलग तीन दिवस घरांवर राहणार ध्वज
तिरंगा ध्वज सलग तीन दिवस घरांवर राहणार आहे. १३ आॅगस्ट रोजी सकाळी तिरंगा ध्वज उभारला की तो १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी काढता येईल. यासाठी विशेष ध्वज संहिता तयार करण्यात आली असून रात्रीही ध्वज घर किंवा इमारतींवर तसाच ठेवण्याची मुभा दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.