आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ वायू सर्वेक्षण:प्रदूषण वाढवणाऱ्या हवेतील विविध घटकांवर मनपाने मिळवले नियंत्रण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पोल्युटन्ट्स’ अर्थात प्रदूषण वाढवणाऱ्या हवेतील घटकांवर मनपाने नियंत्रण मिळविल्याने शहरातील हवेची गुणवत्ता दररोज ७० ते ७५ एक्युआरदरम्यान (एअर क्वालिटी इंडेक्स) राहिली. त्यामुळेच अमरावतीला स्वच्छ हवा सर्वेक्षणात तिसरा क्रमांक मिळाला. यासाठी मनपाने श्वसनशील तरंगते धुलीकण (आरएसपीएम) वाढू नयेत, याकडे विविध उपाययोजना करून लक्ष दिले. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर ऑक्साईड, धुलीकण व नायट्रोजन ऑक्साऊडचे उत्सर्जन कमी प्रमाणात व्हावे यासाठी दोन वर्षांत ७५०० झाडे लावली. त्यापैकी ६ हजार झाडे जगवली. शहरात १७२ लहान-मोठया उद्यानांची निर्मिती करून तेथेही मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासोबतच रस्ते स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच रस्त्यांवरून धूळ वातावरणात उडू नये यासाठी दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली.

योग्यप्रकारे विलगीकरण करून विल्हेवाट लावणे, बायोमायनिंग प्रकल्पासह कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करणे असे प्रयोगही शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरले आहेत. शहराचा सुमारे ७० टक्के भागात जंगलांनी वेढा घातला आहे. तसेच शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवटेकडीवर मोठ्या प्रमाणात हिरवे वृक्ष असून त्यात वृक्षारोपणाद्वारे आणखी भर घालण्यात आली आहे. शहरात रस्त्यांच्या बाजुला रिकामी जागा असेल तेथे वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले.

एक्स्प्रेस हायवे, जुना बायपास, वडाळी व छत्री तलावाजवळ वृक्षारोपण करण्यात आले. तसेच धूळ निर्माण होऊ नये म्हणून लहान, मोठया बांधकामांवर नजर ठेऊन, कचरा पेटवू नये यासाठी जनजागृती, कंपोस्ट डेपोवर बायोमायनिंग अशा विविध उपाययोजना मनपाद्वारे शहरात करण्यात आल्या आहेत. धूर तसेच धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कचरा जाळला जाऊ नये याकडे लक्ष देण्यासोबतच स्वच्छता राहावी म्हणून दररोज घंटागाडी पाचही प्रभागातील वार्डांमध्ये फिरवली जात आहे. तसेच जर झाडाच्या फांद्या तोडल्या तर त्याही तत्काळ मनपाद्वारे उचलून नेल्या जातात. जेणेकरून त्या कोणीही जाळू नयेत, अशा विविध उपाययोजनांमुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता चांगली राहिली आहे.

रस्ता स्वच्छ करण्यासाठी तीन मशीन घेणार : महानगर पालिकेकडे रस्ता स्वच्छ करण्याची सध्या एकच मशीन आहे. तरीही रस्त्यावरून उडणारी धूळ कमी करण्यात मनपाने यश मिळवले. आता सर्व रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगर पालिका आणखी तीन रस्ता स्वच्छ करणाऱ्या मशीनची खरेदी करणार आहे. यासोबतच प्रदूषण वाढवणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, बायोमायनिंगद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे.

प्लास्टिक बंदी, ओला, सुका कचरा व घातक कचरा विलगीकरणात यश : महानगर पालिकेने गेल्या दोन वर्षांत प्लास्टिक बंदी अंतर्गत मोठया प्रमाणात कारवाया करून दंड आकारला. सोबतच ओला, सुका व घातक कचरा तसेच रुग्णालयातील मेडिकल वेस्ट वेगवेगळी गोळा करण्यास सुरुवात केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील मोठे बांधकाम करताना प्रदुषण टाळण्यासाठीच्या उपाययोजना कठोर करीत दंड ठोठावण्यात सुरुवात केली. तसेच बांधकाम पाडल्यानंतर तत्काळ त्यांची विल्हेवाट लावली जावी, याकडे लक्ष दिले. एवढेच नव्हे तर कचरा जाण्यावर पूर्णत: बंदी घातली.

हवा स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाय कामी शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाद्वारे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, रस्त्यांची स्वच्छता, वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण, ई-वाहनांसोबत सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन, कचरा पेटवण्यावर बंदी अशा, विविध उपायांमुळे शहरातील हवा स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळेच आम्हाला यश मिळाले. -डाॅ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा, अमरावती.

प्रदूषण वाढवणारे हवेतील घटक कमी केले हवेतील प्रदूषण वाढविणारे कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, धुळीकण, सल्फर ऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या घटकांचे उत्सर्जन शहरात कमी प्रमाणात होत आहे. ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, नियमित रस्ते स्वच्छतेवर भर देण्यात आला. परिणामी श्वसन शील तरंगते धुलीकण (आरएसपीएम, रेस्पायरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलेट मॅटर) हवेतून कमी झाले. ई-वेहिकल्स वापरण्यास प्रोत्साहन, रस्त्यांची नियमित स्वच्छता, रस्त्यावरील धूळ कमी करणे, किमान एक दिवस सायकलचा वापर बंधनकारक, कचरा व प्लास्टिक जाळण्यावर बंदी, प्लास्टिक बंदीअंतर्गत नियमित कारवाईमुळे सध्या शहरातील हवा स्वच्छ आहे. आरएसपीएमही ८० ते ८५ युजी/मी.क्युब असल्याने समाधानकारक आहे. एस.आर.पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी,अमरावती.

बातम्या आणखी आहेत...