आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावाने केली युवकाची हत्या; अमरावतीची घटना, बहिणीला पळवल्याचा होता राग

चांदूर रेल्वे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात ठेवून भावाने बहिणीचा प्रियकर गावात येताच त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील व कुऱ्हा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आमला विश्वेश्वर येथे गुरुवारी (दि. २६) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक केली. या घटनेमुळे तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (२२, रा. खडकपुरा, चांदूर रेल्वे) असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. पोलिसांनी पळून गेलेल्या दोघांना पकडले होते. मात्र मुलीने आम्ही स्वखुशीने पळून गेलो होतो, असे पोलिसांना जबाबात सांगितले होते. याप्रकरणी मृत अक्षयवर गुन्हा झाला होता.

उपचारासाठी नागपूरला हलवताना रस्त्यातच मृत्यू
घटनेच्या दिवशी मृत अक्षय आमला विश्वेश्वर येथे आला असता मुलीच्या भावाला दिसला. बहिणीला पळवून नेल्याचा राग त्याच्या मनात होता. त्याने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन अक्षयला भिवापूर मार्गावर दुचाकीने नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने सपासप वार केले. नंतर त्याला पुन्हा आमला विश्वेश्वर येथे गावात नेऊन भरचौकात त्याला मारहाण केली. अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तणावाची स्थिती होती. दरम्यान, अक्षय हा उत्तम कबड्डीपटू होता, अशी माहितीही समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...