आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब माहीत झाल्यानंतर पती-पत्नीला जाब विचारत होता. दरम्यान, पती याच कारणावरुन मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे पत्नीने तिच्या प्रियकराला सांगितले. त्यामुळे प्रियकराने एका अल्पवयीनासह तीन मित्रांच्या मदतीने प्रेयसीच्या पतीचा काटा काढला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ मे रोजी उशिरा रात्री मुख्य मारेकऱ्यासह तिघांना अटक केली आहे. बबलू ऊर्फ इजाज खान शब्बीर खान पठाण (४०), सागर रमेशराव मातकर (३०, दोघेही रा. राजुरवाडी, ता. मोर्शी) आणि कृणाल जानराव उईके (३०, रा. तळेगाव ठाकूर, तिवसा) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बबलूचे एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसोबत मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्नीचे बबलूसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची तिच्या पतीला चूणचूण लागली. त्यामुळे महिलेचा पती तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्याचवेळी पती त्रास देत असल्याचे पत्नीने तिचा प्रियकर बबलूला सांगितले. त्याचवेळी बबलूने प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्यासाठी त्याच्या मित्रांच्या मदतीने कट रचला.
सागर मातकर हा बबलुचा आणि त्याच्या प्रेयसीच्या पतीचाही मित्र आहे. दरम्यान २९ एप्रिलला रात्री सागरने मृत व्यक्तीला कॉल करुन आपण दारु पिण्यासाठी जाऊ, असे सांगितले. त्यावेळी सागर व तो व्यक्ती हे दोघे गावालगत असलेल्या कॅनलजवळच्या एका शेतात गेले. त्या ठिकाणी जात असतानाच सागर मातकरने बबलूला कॉल केला. त्यामुळे बबलू त्याचा मित्र कृणाल व एक अल्पवयीन यांना घेऊन त्या शेतात पोहोचले. त्यावेळी बबलूच्या प्रेयसीच्या पतीला घेऊन सागर दारु पित होता.
शेतात पोहोचताच बबलूने दुपट्ट्याच्या सहाय्याने प्रेयसीच्या पतीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह त्याच शेतापासून काही अंतरावर कॅनललगत टाकून निघून गेले. दरम्यान, १ मे रोजी सकाळी शेतकामाला जाणाऱ्या महिलांना एक अर्धवट स्थितीत कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. हा मृतदेह बबलुच्या प्रेयसीच्या पतीचा असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी माहिती काढली. त्यानंतर सोमवारी (दि. १) उशिरा रात्री शिरखेड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बबलू व नंतर त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी बबलुसह तिघांना अटक केली.
ही कामगिरी एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, एपीआय विष्णू पांडे, पीएसआय नितीन चुलपार, एएसआय संतोष मुंदाने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील चव्हाण, मोहन मोरे, सारंग धापड, चेतन गुल्हाणे, प्रमोद शिरसाट, सरिता चौधरी यांनी केली.
बबलू हा तिवसा येथे हमालीचे काम करतो. तर मृत हा गावातच मटण विक्रीच्या दुकानात काम करायचा. गुन्ह्यात बबलूला सहकार्य करणारे त्याचे तीन मित्र त्याच्यासोबत तिवसा येथे हमालीचे काम करतात. बबलूने गळा आवळून खून केला व मृतदेह बाजूला टाकला तसेच त्याच ठिकाणी दारुच्या बाटल्या होत्या. त्यामुळे हा मृत्यू अति मद्य सेवनाने झाल्याचे समोर येईल व आपल्यावर संशय येणार नाही, असे बबलूला वाटले होते. मात्र मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांनी 12 तासात बबलू व इतर आरोपींना बेड्या ठोकल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.