आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त:नागपुरी गेट पोलिसांनी 10 ग्रॅम ‘एमडी’ गवळीपुऱ्यातून केले जप्त

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पुन्हा एकदा ‘एमडी’ ड्रग्ज अर्थात मेफेड्रॉन पकडण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या पथकाने नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा भागात एका तरुणाकडून एमडीच्या सोळा पुड्या जप्त केल्या आहेत. त्याचे वजन १०.३०० ग्रॅम आहे. या पुड्या त्याने चिल्लर विक्रीसाठी तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १०) सायंकाळी केली.

शेख बब्बू शेख सुलेमान (४२, रा. अन्सारनगर) याच्या ताब्यातून पोलिसांनी एमडी हस्तगत केले असून, त्याला ताब्यात घेतले आहे. एमडी ड्रग्ज यालाच ‘म्याऊ म्याऊ’ नावानेही ओळखले जाते. या ड्रग्जचे सेवन केल्यानंतर सेवन करणाऱ्याचे डोळे मोठे मोठे होऊन तो व्यक्ती एकसारखा पाहतो, त्यामुळेच त्याला ‘म्याऊ म्याऊ’ अशी सांकेतिक ओळख संबंधित क्षेत्रात मिळाली आहे. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा भागात शेख बब्बू हा एमडी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.

त्यावेळी त्याच्याकडे १६ पुड्या मिळून आल्या. यापैकी काही पुड्यांमध्ये अर्धा तर काहींमध्ये एक ग्रॅम असे एमडी भरण्यात आले आहे. एमडीच्या एका पुडीची किंमत २ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेख बब्बू एमडीची विक्री कोणाकोणाला करणार होता, त्याने विक्रीसाठी ते कुठून व कसे आणले, याबाबत पोलिस माहीती घेत आहेत. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिस व पोलिस आयुक्तांचे विशेष पथक शनिवारी रात्रीपर्यंत कारवाई करत होते. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये पहिल्यांदा पकडले होते ‘एमडी’
मोठ मोठ्या शहरात उशिरा रात्रीपर्यंत चालणाऱ्या काही पार्टींमध्ये एमडी सारख्या पदार्थांचा वापर केला जात असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. मात्र अमरावतीतही एमडी आता पोहोचले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गुन्हे शाखेने शहरात पहिल्यांदा ‘एमडी’ पकडले हाेते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा शहरात एमडी मिळून आले आहे. याचा अर्थ गांजाप्रमाणेच आता काही व्यसनींना एमडीच्या सेवनाची तलफ जडली असल्याचे लक्षात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...